चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू; जंगलात मोहफूल वेचणं जीवावर बेतले | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू; जंगलात मोहफूल वेचणं जीवावर बेतले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी ग्रामीण भागात मोहफूल संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. आज (गुरूवारी 5 मे 2022) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमावर पट्टेदार वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. आडकू मारोती गेडाम (वय 52) असे या हल्ल्यातील मृताचे नाव आहे. तो नवेगाव हुंडेश्वरी येथील रहिवासी होता.

दरवर्षी उन्हाळा लागला की मोहफूल वेचण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते. ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी नागरिक लगतच्या जंगलात जातात. आज (गुरूवारी, 5 मे 2022) पहाटेच्या सुमारास नागभिड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथील 52 वर्षीय आडकू मारोती गेडाम हा व्यक्ती मोहफूल वेचण्यासाठी गेला होता. हा इसम मोहफूल वेचत असणाऱ्या परिसरात एक पट्टेदार वाघ दबा धरून होता. पट्टेदार वाघाने मोहफूल गोळा करत असलेल्या इसमावर प्राणघातक हल्ला चढविला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. काही अंतरावर मोहफूल गोळा करणा-या इतर लोकांच्या लक्षात घटना आल्यानंतर ते धावून आले. सदर इसम वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. अधिका-यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. गेडाम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नात असा परिवार आहे. घरची सर्व जबाबदारी गेडाम यांच्यावर होती. त्यांच्या या दुर्देवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जाण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वनविभाग मात्र अशा घटना टाळण्यासाठी कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे. जंगलात, गावालगत तसेच थेट गावात येऊन वाघ, बिबट्या हे नागरिकांवर हल्ले करत आहेत. वनाधिकारी वाघांचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत आहेत. सदर मृताच्या कुटूंबियांना तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा

Back to top button