Hanuman Chalisa row | अखेर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल | पुढारी

Hanuman Chalisa row | अखेर राणा दाम्पत्याची तुरुंगातून सुटका, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई; पुढारी ऑनलाईन

Hanuman Chalisa row : मुंबईतील बोरिवली न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या सुटकेचा आदेश जारी केला. त्यानंतर राणा दाम्पत्याची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली. यामुळे तब्बल १३ दिवस न्‍यायालयीन कोठडीत असणार्‍या राणा दाम्‍पत्‍याला मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राणा दाम्पत्य भायखळा कारागृहातून बाहेर पडले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa row) करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल बुधवारी सुनावणी झाली होती. न्यायालयाने राणा दाम्‍पत्‍याला जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली.

पत्रकारांशी संवाद साधू नये, पोलिस तपासात अडथळे निर्माण होतील असे कोणतेही कृत्‍य करु नये, साक्षीदारांना प्रलोभन दाखवणे अथवा त्‍यांच्‍यावर दबाव आणू नये, पुन्‍हा अशा गुन्‍ह्यात सहभागी घेवू नये, अशा अटी घालत विशेष न्‍यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्‍पत्‍याला प्रत्‍येकी ५० हजारु रुपयांची वैयक्‍तिक हमी तसेच तेवढ्याचर रकमेचे दोन हमीदार देण्‍याच्‍या अटींवर जामीन मंजूर केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी, राणा दाम्पत्याची चांगलीच कानउघडणी केली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावला होता. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर १२४ अ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते. दरम्यान, जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात, तर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती.

जेलमधून सुटण्यासाठी राणा दाम्पत्याच्या घरी बीएमसीचं पथक दाखल

तुरुंगातून सुटण्याआधी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरी मुंबई महानगरपालिकेचं पथक दाखल झाले आहे. त्यांच्या घरी अवैध बांधकाम झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

Back to top button