खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा जोडीचा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा मुहूर्त ठरला ! | पुढारी

खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा जोडीचा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा मुहूर्त ठरला !

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण न केल्यास मातोश्री समोर हनुमान चालिसा वाजवणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. मात्र, युवा सेनेने सडेतोड उत्तर देत शुक्रवारी १५ एप्रिल रोजी रात्रीच आमदार राणांच्या शंकर नगर स्थित गंगासावित्री निवास स्थानासमोर हनुमान चालिसा वाजवला.

दुसरीकडे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी १६ एप्रिल रोजी अकोली मार्गावरील पगडीवाले हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करीत 100 मंदिरात भोंगे वाटप केले. घरासमोर धिंगाणा घालणारे भगोडे होते, शिवाय छातीठोक पणे मातोश्रीवर जाणार असल्याचे आमदार राणा म्हणाले होते. आता त्यांनी हनुमान चालीसा पठणाचा मुहूर्त निश्चित केला आहे.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा २२ एप्रिलला मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. कार्यकर्त्यांसह ते मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी येऊन दाखवाच असे प्रतिआव्हान यापूर्वीच दिलं आहे, त्यामुळे शुक्रवारी होणार, तरी काय याची उत्सुकता आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे काढा अन्यथा भोंगे लावत हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हनुमान चालिसावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.

100 भोंगे वाटले

हनुमान जयंतीच्या पर्वावर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी अकोली स्थित पगडीवाले हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण केले. महाआरती करून आघाडी सरकारच्या रूपाने लागलेली साडेसाती दूर होऊन शेतकरी-शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, गृहिणी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांना सुख समृद्धी शांती लाभावी अशी प्रार्थना केली.
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी राममंदिरात सुंदरकांड व हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या पर्वावर गंगासावित्री निवासस्थानी विविध राममंदिर व हनुमान मंदिर देवस्थानांना 100 भोंग्यांचे वाटप करण्यात आले. भोंगे वाटपाचा कार्यक्रम पुढील एक महिना सुरू राहणार आहे. मागेल त्याला भोंगा देण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचलं का ?

Back to top button