अमरावतीमध्ये राणा कुटुंब आणि शिवसेनेत वादाचा भोंगा नेमका कधी सुरु झाला ? | पुढारी

अमरावतीमध्ये राणा कुटुंब आणि शिवसेनेत वादाचा भोंगा नेमका कधी सुरु झाला ?

प्रेमदास वाडकर : पुढारी वृत्तसेवा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत सरकारला इशारा दिला होता. अन्यथा आम्ही हनुमान चालीसा पठण करू असे त्यांनी म्हटले. अमरावतीत राज ठाकरे यांचा मुद्दा आमदार रवी राणा व खासदार नवनीत राना यांनीच हायजॅक केला. भोंगे व हनुमान चालीसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाना राणा दाम्पत्याने साधला.

हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करा, अन्यथा आम्ही येऊन मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करू असा इशारा राणा दांपत्याने दिला होता. यावरून शिवसेना व राणा दाम्पत्यात पुन्हा एकदा वाक् +युद्ध सुरू झाले.

आमदार राणांनी केवळ इशारा दिला. मात्र युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांनी हनुमान जयंतीच्या पूर्वीच राणा यांच्या गंगा सावित्री निवास स्थानासमोर हनुमान चालीसा पठण करून जोरदार प्रत्युत्तर दिले. तर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी शहरातील शिवसैनिकांनी आमदार राणा यांच्या घरावर धडक देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स देखील यावेळी शिवसैनिकांनी तोडले. पोलिसांनी अडविल्यानंतर त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी पुन्हा हनुमान चालीसा पठण केला. तर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण करण्यासाठी येणाऱ्या सैनिकांसाठी रेड कार्पेट टाकत सरबताची देखील व्यवस्था केली होती.

शिवसेना -राणा : २०१४ वर्षांपासून सत्तासंघर्ष

माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी सर्वप्रथम २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीपासूनच शिवसेना आणि राणा दाम्पत्यात तेढ निर्माण झाली. त्यावेळची निवडणूक राणा हरल्या तरी त्यांनी अडसूळ यांच्या विरोधात दाखल केलेली प्रकरणे चांगलीच गाजली होती. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी लोकसभेचा गड सर केला. मात्र बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक जिंकल्याचा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. एवढेच नव्हे तर एकेक कोर्ट करीत उच्च न्यायालयात नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध केले.

उच्च न्यायालयाने देखील नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्यावर शिक्कामोर्तब केले. या प्रकरणाची सुनावणी सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्याच आमदार राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याने शिवसैनिक संतप्त झाले.

शिवसेना -राणा यांचा वाद यातून भाजपला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर पक्षांच्या मदतीने नवनीत राणा या भाजप विरोधी मतांचा आधार घेत लोकसभेत पोहोचल्या. मात्र लोकसभेत दाखल होताच नवनीत राणा यांनी त्यांचा रंग बदलला. नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होत असताना नवनीत राणा यांनी भाजपला समर्थन केले. शिवाय आमदार रवी राणा देखील महाराष्ट्रात भाजपमध्ये मिसळताना दिसून येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणा सोडताना दिसत नाही.

महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत इशारा दिला आहे. याच मुद्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठन करावे. अन्यथा हनुमान जयंतीनंतर खासदार नवनीत राणा यांच्यासह मातोश्रीवर पोहोचत हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.

यावर पलटवार करीत महानगर शिवसेनेने आमदार रवी राणा यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा देत आमदार रवी राणा यांना ललकारले होते.

मातोश्रीवर वाचणार चालिसा-आमदार राणा

आमदार रवी राणा यांनी शुक्रवार, १६ एप्रिलला एका व्हिडीओद्वारे हनुमान जयंतीला सकाळी ९ ते ११ पर्यंत अकोली रोड वरील खंडेलवाल नगर स्थित पगडीवाले हनुमान मंदिरात आपल्या हाताने भोंगा चढविणार असल्याचे सांगितले. भोंगे नसलेल्या हनुमान मंदिरात भोंगे लावणार असल्याचे आमदार राणा म्हणाले. खासदार नवनीत राणा यांच्यासह भोंग्यावर हनुमान चालिसा पठन करणार आहे. राम मंदिरात सुंदरकांड झाले पाहिजे म्हणून भोंगे वाटप करणार आहे.

हनुमान जयंतीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जागृत केले पाहिजे. हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालिसा वाचत नसेल तर त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. ते विचार जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर खासदार नवनीत राणा आणि स्वत: मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा आमदार राणा यांनी दिला होता.

मातोश्रीवर जाल तर हनुमानजी करू : पराग गुडधे

आमदार राणा यांना चोख प्रत्युत्तर देत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी राणांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. भाजपाच्या पोसनीचे असलेले आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मातोश्री समोर हनुमान चालिका वाचेल, असा इशारा दिला.

मातोश्री हे शिवसैनिकांकरिता एक मंदिर आहे. काही जण पाठवून बेशरमचे झाड लावण्यासाठी ते काही भाजपाच्या आमदाराचे घर नाही. मातोश्रीवर जाल तर हनुमानजी केल्या शिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. मातोश्री बाहेर कधी काळी दिवाळी साजरी करणार होते, कधी दिसले नाही. आंदोलन करणार होते, कधी दिसले नाही, केवळ बताल्या गोष्टी करीत भ्रमीत करायचे.

हनुमान जयंतीचा दिवस तुमचा, रविवारी १२ वाजेपर्यंत मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचून दाखवा, अन्यथा राणा निवासाबाहेर रविवारी १७ एप्रिलला दुपारी १२ वाजता शिवसेना हनुमान वाचेल, असा इशारा गुडधे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठन न केल्यास मातोश्री समोर हनुमान चालिसा वाजविणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. मात्र, युवा सेनेने सडेतोड उत्तर देत शुक्रवारी (१५ एप्रिल) रात्रीच आमदार राणांच्या शंकरनगर स्थित गंगासावित्री निवास स्थानासमोर हनुमान चालिसा वाजविला.

तर दुसरीकडे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी (१६ एप्रिल) अकोली मार्गावरील पगडीवाले हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठन करीत १०० मंदिरात भोंगे वाटप केले. घरासमोर धिंगाणा घालणारे भगोडे होते, शिवाय छातीठोक पणे मातोश्रीवर जाणार असल्याचे आमदार राणा म्हणाले. (शिवसेना -राणा)

हनुमान चालिसावरून राजकारण तापलं

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे काढा अन्यथा भोंगे लावत हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हनुमान चालिसावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.

मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करण्याचा राणा दाम्पत्याने इशारा दिल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी राणा निवासावर धडक दिली. चार ही बाजूने पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना देखील शिवसैनिकांनी धडक देत बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी अडविल्यानंतर बॅरिकेट्स जवळच बसत शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार राणा यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे पठन केले. महानगर प्रमुख पराग गुडधे व जिल्हा प्रमुख राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात रविवारी (१७ एप्रिल) सकाळी ११ वाजताच्या सुमारास काढण्यात आलेल्या मोर्चामुळे राजापेठ परिसर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दणाणून गेले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेत नंतर सोडून देण्यात आले.

जबरदस्त शक्ती प्रदर्शन

राजापेठ स्थित महानगर शिवसेना कार्यालयातून हातात भगवा ध्वज घेत शिवसैनिकांनी पायदळच राणा निवासाकडे कूच केले. अंडरपासमधून शंकरनगरच्या दिशेने जाताना जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. शंकर नगरात राणा निवास गंगा सावित्रीच्या दोन्ही बाजूने पोलिसांनी सावधगिरी म्हणून बॅरिकेट्स लावले होते.

यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांना शांत करण्याकरिता पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी शिवसैनिकांना बॅरिकेट्स पार करताना रोखले. यावेळी पोलिसांसोबत शिवसेना कार्यकर्त्यांची धक्काबुक्की देखील झाली.

जबरदस्त शक्ती प्रदर्शन करीत शिवसैनिकांनी बॅरिकेट्स जवळ बसत हनुमान चालिसाचे वाचन केले. यावेळी राणा दम्पती विरोधात मुर्दाबादची प्रचंड नारेबाजी करण्यात आली. महिलांनी यावेळी राणा यांच्या निवास स्थानाच्या दिशेने बांगड्या देखील भिरकाविल्या. (शिवसेना -राणा)

Back to top button