यशोमती ठाकूर यांच्या आडून डॉ. अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा | पुढारी

यशोमती ठाकूर यांच्या आडून डॉ. अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री वकील यशोमती ठाकूर यांनी केलेल्या ‘पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, या वक्तव्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. भाजप नेते तथा माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी देखील यशोमती ठाकूर काही खोटं बोलल्या नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर कोणताच वचक नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पद सांभाळू शकत नाही. दौरा करीत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात बेबंदशाही, अराजकता माजली असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. मुख्यमंत्री अकार्यक्षम असल्याने यशोमती ठाकूर यांच्याकडून अशा भावना व्यक्त झाल्या किंवा नाही तरी शरद पवार हेच रिमोट कंट्रोलने सरकार चालवित आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्रीच झाले असते तर बरे झाले असते असे म्हणायचे असेल. एवढे मात्र खरे की यशोमती ठाकूर ह्या जनतेच्या भाषा बोलल्या असल्याचे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

आघाडीत तणातणी

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद असल्‍याची सुरु चर्चा मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही देखील मुख्यमंत्री पदाबाबत महत्वाकांक्षा असू शकतात, असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button