यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील शिक्षक दाम्पत्य घाटंजी तालुक्यातील वासरी येथे लग्नाला जाण्यासाठी यवतमाळला आले होते. वर्धा येथून पाच महिलांची टोळी ट्रॅव्हल्समध्ये बसली. या महिलांनी रेटारेटी करीत शिक्षक दाम्पत्यांची बॅग कापून त्यातील पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. यवतमाळातील लुटारू महिलांची टोळी विदर्भात कुप्रसिद्ध आहे. या टोळीचा हा कारनामा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पंकज राठोड (रा. अयोध्यानगरी, नागपूर) हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक्षरश: राठोड दांपत्याला घेरले. याच पाच मिनिटात त्यांनी बॅग धारदार वस्तूने कापून दागिने बांधून असलेली पुरचंडी बाहेर काढून घेतली. हा प्रकार राठोड दांपत्याच्या लक्षात आला नाही.
मात्र, महिला अधिकच लगट करीत असल्याने त्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. नंतर राठोड दांपत्य यवतमाळात उतरले. यवतमाळमध्ये त्यांनी बॅग उघडून बघितली असता त्यातील सोन्याची पुरचंडी आढळली नाही. दागिने घरीच राहिले असतील, असा संशय आल्याने खासगी वाहन करून ते तत्काळ नागपूर येथे पोहोचले. मात्र, नागपुरातील घरीही दागिने मिळाले नाही, पुन्हा त्यांनी प्रवासाला घेतलेली बॅग तपासली. तेव्हा ती बॅग कापल्याचे आढळून आले. नंतर प्रवासातील पूर्ण घटनाक्रमच त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. ट्रॅव्हल्समधील प्रवासात त्या पाच महिलांनी कोंडाळे करुन गर्दीत बॅग कापली आणि बॅगमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेली पुरचंडी बॅगमधून अलगद बाहेर काढली. या प्रकरणी पंकज राठोड यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचलंत का ?