स्वाभिमानीतून हकालपट्टी केलेले आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर | पुढारी

स्वाभिमानीतून हकालपट्टी केलेले आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १० एप्रिल रोजी भुयार यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानीचे एकमेव अमरावती जिल्ह्यातील आमदार भूयार यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याची घोषणा संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी हिवरखेड (जि. अमरावती) येथील शेतकरी मेळाव्यात केली होती.

आमदार भूयार हे वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडून आले होते. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना त्यांनी पराभूत केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती.

आमदार देवेंद्र भूयार हे शेतकरी चळवळीतून गायब झाले आहेत, अशी त्यांच्या विषयी तक्रार होती. त्यांनी स्वत:हून संघटनात्मक कार्यातून स्वत:ला बाजूला केल्याची चर्चा होती. संघटनेतील निर्णय घेताना मला विश्वासात घेतले तर मी तुमच्या सोबत अन्यथा तुमच्या शिवाय असा इशारा देखील आमदार भूयार यांनी दिला होता. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये देखील त्यांच्याबद्दल मतभेद होते. ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार नसतील, तर आम्हाला असला आमदार नको, अशी भूमिका स्वाभिमानी विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होते. या सर्व पार्श्वभूमीवर विदर्भ दौऱ्यावर असताना संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भूयार यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button