गुढीपाडव्याच्या दिवशी तरी राजकारण नको : विजय वडेट्टीवार

गुढीपाडव्याच्या दिवशी तरी राजकारण नको : विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : सगळ्यांनीच मोठे मन करून जगावे. म्हणजे जगण्याचा आनंद सर्वांनाच घेता येईल. निदान गुढीपाडव्याच्या मंगल दिवशी तरी राजकारण करू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आज (शनिवार) येथे माध्यमांशी बोलताना केले. वडेट्टीवार यांनी नागपुरातील निवासस्थानी गुढीपूजन केले. त्या नंतर बोलताना त्यांनी आज चांगला दिवस आहे. सर्व शुभ व्हावे. आणि सत्ताधारी तसेच विरोधकांसाठी येणारे वर्ष चांगले जावे, अशा शुभेच्छा दिल्या.

मुंबई मेट्रो रेल्वेचे लोकार्पण शनिवारी झाले. निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नावही नसल्याबद्दल टीका होत आहे. महाविकास आघाडीचे मन छोटे असल्याची टीका होत आहे. त्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी विरोधक असो वा सत्ताधारी सगळ्यांनीच मोठे मन करून जगायला शिकले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. निदान गुढीपाडव्याच्या मंगल दिवशी राजकारण व्हावे, असे मला वाटत नाही. या दिवशी सत्ताधारी असो वा विरोधकांच्या दृष्टीने सगळे शुभ शुभ व्हावे, असे ते (Vijay Vadettiwar) म्हणाले. सगळ्यांनीच मोठे मन करून जगावे. म्हणजे जगण्याचा आनंद सर्वांनाच घेता येईल.

दोन वर्ष कोरोनामुळे विकासाला गती देता आली नाही, हे खरे आहे. या दोन वर्षात सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. पण, पुढची दोन वर्ष महाविकास आघाडीची असणार आहेत. या दोन वर्षात महाराष्ट्राच्या विकासाची नवी गुढी उभारू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. दोन वर्षांनंतर कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्तीही झाली. आता मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी लोकांनी शक्यतो मास्क घालावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news