भंडारा : झुंजीमुळे त्या वाघाचा मृत्‍यू झाला असावा, वन विभागाचा प्राथमिक अंदाज | पुढारी

भंडारा : झुंजीमुळे त्या वाघाचा मृत्‍यू झाला असावा, वन विभागाचा प्राथमिक अंदाज

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा :  तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त बपेरा गावाशेजारील बावनथडी वितरिकेतील पाण्यात गुरुवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला होता. आज चिंचोली येथील शासकीय आगारात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत तो गंभीर जखमी झाला असावा. गंभीर जखमी अवस्थेत असल्याने उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

पंचासमक्ष मृत वाघाची बाह्य तपासणी व शवविच्छेदन करण्यात आले. वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. मृत वाघाच्या जबड्यातील खालील एक सुळा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचप्रमाणे समोरचा उजवा पाय सांध्यामधून निखळलेला आढळला व समोरच्या डाव्या पायाजवळ पंज्याशेजारी जखमा आढळून आल्या आहेत. मृत वाघाच्या चारही पायांची नखे घासल्यामुळे झिजलेल्या अवस्थेत आढळून आली. याव्यतिरिक्त वाघाचे सर्व अवयव मिशा, दात शाबूत आढळले.

शवविच्छेदनात वाघाचे पोट रिकामे आढळून आलेले आहे. वाघाचा मृत्यू झालेल्या परिसरात इतर नर वाघांचा वनक्षेत्रात वावर असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. सदरचे क्षेत्र पेंच व्याघ्र प्रकल्पास जोडणारा महत्त्वाचा भ्रमणमार्ग देखील आहे. मृत वाघाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी असून,तो अवयस्क असल्याने स्वतंत्र टेरिटोरीच्या शोधात भटकंती करताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत तो गंभीर जखमी झाला असावा. गंभीर जखमी अवस्थेत असल्याने उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचे अंतरीय अवयवांचे नमुने उत्तरीय तपासणीस न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा नागपूर येथे पाठवण्यात येणार आहेत. वनविभागाद्वारे इतर शक्यतांची देखील चाचपणी सुरू आहे.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे प्रतिनिधी म्हणून भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक नदीम खान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून वन्यजीव रक्षक शाहिद खान, पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. पंकज कापगते, डॉ. जितेंद्र गोस्वामी, डॉ. एस. सी. टेकाम, उपवनसंरक्षक राहुल गवई, विभागीय वन अधिकारी दक्षता प्रितमसिंग कोडापे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, यशवंत नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संजय मेंढे उपस्थित होते.

Back to top button