गडचिरोली : जीडीसीसी बँकेतील ६५ लाखांच्या अपहारप्रकरणी ८ जणांना सश्रम कारावास | पुढारी

गडचिरोली : जीडीसीसी बँकेतील ६५ लाखांच्या अपहारप्रकरणी ८ जणांना सश्रम कारावास

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ वर्षांपूर्वी झालेल्या सुमारे ६५ लाख ८० हजार ७६३ रुपयांच्या अपहारप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी ८ आरोपींना सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नीळकंठ गणपत खळतकर, विठ्ठल माधव अंड्रसकर, किशोर चक्रपाणी येलमुले, विजय मधुकर धकाते, किरण वामनराव शेरके, नरेश लक्ष्मण नागोसे, वासुदेव वकटू घोडाम व प्रमोद विश्वनाथ दुपारे अशी आरोपींची नावे असून, ते बँकेचे कर्मचारी होते.

२००७ मध्ये जीडीसीसी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अरुण मुद्देशवार यांनी बँकेत ६५ लाख ८० हजार ७६३ रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले यांनी ३१ मे २००७ रोजी उपरोक्त ८ जणांसह शांताराम निकोडे, मनोहरे तावेडे, भैयाजी आत्राम, प्रभावती सोनकुसरे व मिनाक्षी खडतकर अशा १३ जणांवर भादंवि कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

बुधवारी(दि .३०) मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशिमकर यांनी साक्षदारांची साक्ष नोंदवून आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून प्रकरणाचा निकाल जाहीर केला. आरोपींनी १ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत ६५ लाख ८० हजार ७६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रमुख आरोपी नीळकंठ गणपत खळतकर यास ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, विठ्ठल माधव अंड्रसकर यास २ वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड, तर किशोर चक्रपाणी येलमुले, विजय मधुकर धकाते, किरण वामनराव शेरके, नरेश लक्ष्मण नागोसे, वासुदेव वकटू घोडाम, प्रमोद विश्वनाथ दुपारे या सहा आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button