देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ४ एप्रिलला भाजपचा गडचिरोलीत महामोर्चा | पुढारी

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ४ एप्रिलला भाजपचा गडचिरोलीत महामोर्चा

गडचिरोली पुढारी वृत्तसेवा: कर्जमाफी, वीजबिल,बंद असलेली धान खरेदी केंद्रे आणि अन्य विषयांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने ४ एप्रिलला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

खासदार अशाेक नेते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सत्तेत येताच या सरकारने धानाला सातशे रुपये बोनस जाहीर केला होता. परंतु दोन वर्षांपासून बोनस मिळालेला नाही. रीडिंग न घेताच शेतकऱ्यांना अवाढव्य बिल पाठविण्यात येत असून, कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती; परंतु महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली नाही. उलट सक्तीची कर्जवसुली केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोह्यांना सहकार्य केल्याचे पुरावे असताना त्यांना मंत्रिमंडळात काढून का टाकण्यात येत नाही, असा सवालही खासदार नेते यांनी केला.

हेही वाचा

Back to top button