‘अमजद खान’ नावाने फोन टॅप : नाना पटोलेंचा रश्मी शुक्लांविरोधात ५०० कोटींचा दावा ठोकला | पुढारी

'अमजद खान' नावाने फोन टॅप : नाना पटोलेंचा रश्मी शुक्लांविरोधात ५०० कोटींचा दावा ठोकला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपची सत्ता राज्यात असताना ६ राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचेही नाव होते. दरम्यान, या प्रकरणी फोन टॅप करणाऱ्या पुण्याच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोले यांनी नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात ५०० कोटींचा मानहानीचा दावा गुरूवारी (दि. २४) दाखल केला. एका ट्विटद्वारे नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे येथील २०१७-१८ मध्ये फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त होत्या. राज्य सरकरानं चौकशी समिती नेमली होती. ही चौकशी पूर्ण झाली. समितीने याचा अहवाल पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला. चांदगुडे यांनी शुक्ला आणि इतरांविरोधात २५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावेळी ६ राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या राजकीय नेत्यांचे फोननंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले गेले होते. अमजद खान या नावाने नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. हे सर्व करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला गेला नव्हता.

यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सरकारनं आश्वासन दिलं की, आम्ही चौकशी करतो. चौकशीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कारवाई करतो. सरकरानं संपूर्ण चौकशी केली. त्यावेळच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या त्याठिकाणी दोषी आढळल्या. त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे. हा दावा जवळपास ५०० कोटी रुपयांचा आहे. या पद्धतीनं कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्याला त्रास देणं. त्याला ब्लॅकमेल करणं. ही पद्धत बंद व्हावी, या यामागचा उद्देश आहे. या सगळ्या षड्यंत्राच्या मागे आणखी कोण-कोण आहे, हेही स्पष्ट होणे गरजेचं असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा

या दाव्यामध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त, नागपूर पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा दाव्यातील इतर प्रतिवादींमध्ये समावेश आहे. नाना पटोले यांच्याकडून अॅड. सतीश उके व अॅड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले. नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button