चंद्रपूर : सिवरेज टाकीत सफाईसाठी उतरलेल्या ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : सिवरेज टाकीत सफाईसाठी उतरलेल्या ३ कामगारांचा गुदमरून मृत्यू

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

सांडपाणी व भूमिगत सिवरेज टाकी, गटार साफ करण्यासाठी उतरलेल्या दोन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना मंगळवारी (२२ मार्च) ला वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती – धोपटाळा टाऊनशिप येथे सकाळी ९ वाजता घडली. दरम्यान तीन कामगारांची प्रकृती गंभीर होती. त्यापैकी पुन्हा एका कामगाराचा उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत या घटनेत मृतांची संख्या तीन झाली आहे.

नागपुरात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव सुशील कोरडे असे आहे. यापूर्वी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजूरा तालुक्यातील आणि वेकोली बल्लारपूर क्षेत्रात असलेल्या सास्ती – धोपटाळा टाऊनशिपमध्ये २२ मार्चला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कंत्राटी कामगार दहा फूट खोल असलेल्या टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते परत वर न आल्याने तसेच आवाज देऊनही प्रतिसाद न दिल्याने कंपनीचा एक कर्मचारी टँकमध्ये उतरला. मात्र तोही वर आला नाही शिवाय त्यानेही आवाजाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वर असलेले कामगार घाबरले आणि त्यांनी शेजारच्या लोकांना माहिती दिली.

यानंतर तातडीने टँकवरील स्लॅप जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोली कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले आणि उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले. जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता ५-७ मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले.

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत गुदमरलेत. त्यापैकी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वेकोलीचे कामगार सुशील कोरडे यांना नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचाही नागपूरात मृत्यू झाला आहे. आता मृतांचा आकडा ही तीन झाला आहे. वेकोली कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Back to top button