पंतप्रधानांना दोन तासदेखील झोपू द्यायचे नाही, असंच भाजप नेत्यांनी ठरवलंय : संजय राऊत | पुढारी

पंतप्रधानांना दोन तासदेखील झोपू द्यायचे नाही, असंच भाजप नेत्यांनी ठरवलंय : संजय राऊत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर काम करतात. दोन तास झोपण्याचा त्यांचा प्रयोग चांगला आहे. तथापि, त्यांना दोन तासदेखील झोपू द्यायचे नाही, हे राज्यातील भाजप नेत्यांनी बहुधा ठरवले आहे. त्यानुसार नेते मंडळी कामाला लागली, त्यांना झोपच येत नाही, असा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपुरात बोलताना लगावला.

शिवसंपर्क अभियानानिमित्त खासदार राऊत (Sanjay Raut) यांचे नागपुरात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी परत एकदा भाजपला लक्ष्य केले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात ईडीसारख्या तपास यंत्रणा भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करतात, त्यांना ते करू द्या, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला.

विदर्भ, मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा, असे आदेश पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार खासदार कामाला निघाले आहेत. या दोन्ही भागात असलेली संघटना अधिक बळकट करणे, विस्तार करण्यावर भर राहील. लोकसभा, विधानसभा, महापालिकांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने पक्षाचे खासदार विदर्भ, मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचतील. त्यांच्यासोबत मुंबई-ठाणे येथील २०-२० शिवसैनिकांची टीम राहील, चार दिवसांनी पक्षप्रमुखांना अहवाल सादर करण्यात येईल.

संपर्क अभियान आगामी निवडणुकीची तयारी आहे का, असे विचारले असता, संघटनेचे काम वर्षभर चालते, सत्ता येते, राजकारण होत असते, बदल होत असतात. संघटनेचा पाया मजबूत असणे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवसेनेची संपूर्ण ताकद महाराष्ट्रातील संघटना असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना संपर्क अभियानामुळे आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : ‘झुंड’ मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

Back to top button