रेडिओ जॉकी बनायचंय? ‘या’ गोष्टी येणे आवश्यक | पुढारी

रेडिओ जॉकी बनायचंय? 'या' गोष्टी येणे आवश्यक

आपल्याला रेडिओ मध्ये करिअर करायचे असेल तर केवळ रेडिओ जॉकीच नाही तर त्याहीपेक्षा करिअरच्या द़ृष्टीने आणखी संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. या संधीचा तरुण वर्ग चांगल्या रितीने फायदा उचलू शकतात.

रेडिओ ची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अलीकडेच एफएमच्या विस्ताराने रेडिओ क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.

रेडिओ क्षेत्रातील संधी

 

रेडिओ जॉकी : बोलण्यात गोडवा आणि स्पष्ट उच्चार असणे गरजेचे आहे. एक चांगला रेडिओ जॉकी होण्यासाठी सामान्यज्ञान, सभोवताली घडणार्‍या घटनांचे आकलन, संगीतातील आवड, आपले विचार वेगळ्या शैलीत मांडणे या गोष्टी असणे गरजेचे आहे. प्रसंगानुसार आवाजात चढउतार करण्याचे कसब रेडिओ जॉकीला येणे आवश्यक आहे.

कॉन्टेट हेड : श्रोत्यांना खिळवून ठेवता येईल अशा भाषाशैलीचा आणि माहितीचा समावेश करावा लागतो.नवनवीन कल्पना मांडणे, एखाद्या विशेष क्लाईंटसाठी कस्टमाईज्ड कॉन्टेट, एखाद्या विशेष दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम, ऐनवेळचे विशेष कार्यक्रम आदींचे नियोजन करण्याची जबाबदारी कॉन्टेट हेडवर असते.

प्रोग्रॅमिंग हेड : प्रोग्रॅमिंग हेडला रेडिओ जॉकीची टीमशी समन्वय, म्युझिकचे नियोजन, आऊटडोर आरजे, प्रोड्यूसर, सेल्स टीमबरोबर टीमवर्क करावे लागते.

स्क्रिप्ट रायटर (पटकथा लेखन) : रेडिओत स्क्रिप्ट रायटरला क्लाईंटच्या जाहिरातीच्या द़ृष्टीने देखील लेखन करावे लागते. याशिवाय त्यांना विशेष कॅप्सूल स्क्रिप्ट, ब्रांड इंटिग्रेशन, कॅरेक्टर स्क्रिप्ट, निवडक क्लाईंटस यासाठी देखील टॅगलाईन तयार करावी लागतात.

प्रोमो प्रोड्यूसर : प्रोमो प्रोड्यूसरचे काम हे कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रोमोला वेळेवर प्रसारीत करणे, जाहिरातीचे स्क्रॅच करणे आणि नियोजनबद्ध रितीने निर्मिती करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागतात.

म्युझिक शेड्यूलर : कोणत्या वेळी कोणते गाणे वाजवायचे, कार्यक्रमाची थीम ठरवणे आणि त्यानुसार गाण्याचे सादरीकरण, विशिष्ट दिवसांनिमित्त गाणी वाजवणे, ऋतुनुसार किंवा आवडीनुसार गाणे वाजवणे, म्युझिक रिपोर्टस् तयार करणे आदी कार्य करावी लागतात.

साऊंड इंजिनिअर : कार्यक्रमासाठी विशेष मुलाखती, गेस्ट लिस्ट, ऑडिओ बाईट, लिसनर कनेक्ट, लिसनर मॅनेजमेंट सिस्टीम, कॉन्टेस्ट्रस ट्रॅक आदींचे नियोजन रेडिओ प्रोड्यूसरला करावे लागते.

फिल्ड आरजे : फिल्ड आरजेचे काम प्रामुख्याने स्टुडिओच्या बाहेर फिल्ड रेकॉर्डिंग करण्याचे असते. याशिवाय स्टुडिओशी कनेक्ट करून कार्यक्रमात मदत करणे, विशेष दिवसानिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमासाठी श्रोत्यांचा बाईट घेणे, वॉकस पॉप तयार करण्यासाठी मदत करणे आदींचा समावेश आहे.

रेडिओ सेल्स आणि रेडिओ मार्केटिंग : रेडिओ सेल्स आणि मार्केटिंगची टीम रेडिओला महसूल मिळवण्यासाठी ब्रँडिंगचे काम करते. क्लाईंटस्ला रेडिओच्या कार्यक्रमाशी जोडणे आणि त्यांच्या प्रॉडक्टला रेडिओच्या माध्यमातून प्रमोट करण्याचे कामदेखील रेडिओ सेल्स आणि मार्केटिंग विभागाला करावे लागते.

पात्रता आणि अभ्यासक्रम : आपण 12 वी उत्तीर्ण असाल आणि मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी घेतलेली असेल तर आपण रेडिओमध्ये काम करण्याची किमान शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे, असे समजू शकता. आजकाल बहुतांश शैक्षणिक संस्था रेडिओ जॉकी, रेडिओ प्रॉडक्शन, रेडिओ मॅनेजमेंट आदींमध्ये शॉर्ट टर्म किंवा डिप्लोमाचे अभ्यासक्रम घेत आहेत.आपले व्यक्तिमत्त्व आकर्षण असण्याबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

– राधिका बिवलकर

Back to top button