गडचिरोली : सहायक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

गडचिरोली : सहायक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : अपघातासंदर्भात गुन्हा दाखल झालेल्या इसमास आरोपी न करण्यासाठी त्याच्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलापल्ली येथील पोलिस चौकीत कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सोमजी सिडाम यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील एका इसमाने आपल्या मोटारसायकलने दुसऱ्या मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या इसमावर गुन्हा दाखल करुन मोटारसायकल जप्त केली. परंतु त्या इसमास आरोपी न करण्यासाठी तसेच मोटारसायकल परत देण्यासाठी सहायक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम याने त्यास ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तो ५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.

दरम्‍यान, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने गुन्हा दाखल झालेल्या इसमाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सहायक पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सिडाम यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा  

Back to top button