वर्धा : नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला | पुढारी

वर्धा : नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : आजनसराजवळच्या हिवरा येथील वर्धा नदी पात्रात दोन युवक बुडाले होते. ६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेतील एका युवकाचा मृतदेह (dead body) सोमवारी (दि. ७) तर दुसऱ्या युवकाचा मृतदेह आज (मंगळवार) मिळाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वर्धा नदी पात्रातील हिवरा घाट येथे ६ मार्च रोजी पोहताना नदीत बुडालेल्या दोन युवकांपैकी ऋतिक पोखळे याचा २४ तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह (dead body) मिळाला होता. संघर्ष चिंधुजी लढे यांचा शोध लागला नव्हता. वडनेर पोलीस ठाण्याचे जमादार प्रशांत वैद्य, तुषार इंगळे, गुणवंता चिडाम व स्थानिक मच्छिमार विकास पडाल, मंगेश कापटे, चंद्रभान पेंदोर यांनी मंगळवारी पहाटेपासूनच युद्धस्तरावर शोध मोहीम राबविली. हिवरा घाटाच्या जवळच सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संघर्ष लढे यांचा मृतदेह मिळाला.

पिपरी (पोहणा) येथील ऋतिक नरेश पोखळे, संघर्ष चंदूजी लढे, रंजित रामाजी धाबर्डे, शुभम सुधाकर लढे हे चारही मित्र पिपरी येथील जलकुंभाच्या पाईपलाईनचे काम करीत होते. ते काम करून वर्धा नदी पात्राच्या हिवरा येथील घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीत उड्या घेत पोहू लागले. त्यातील दोन जण पाण्याबाहेर निघाले. परंतु ऋतिक नरेश पोखळे, संघर्ष चिंदूजी लढे हे दोघे खोल पाण्यात बुडाले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्या दोघांचा पाण्यात शोध घेतला जात होता. ऋतिक नरेश पोखळे याचा मृतदेह सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्याचा मित्र संघर्ष चंदुजी लढे यांचा मृतदेह आज मिळाला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक बागडे व त्यांची चमू करीत आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : “अजून खूप शिखरं गाठायचीयंत” – अमृता खानविलकर | Power Women | International Women’s Day 2022

Back to top button