नागपूर : देशातील पहिली हायड्रोजन कार येत्या १६ मार्चला दिल्लीत धावणार : नितीन गडकरी | पुढारी

नागपूर : देशातील पहिली हायड्रोजन कार येत्या १६ मार्चला दिल्लीत धावणार : नितीन गडकरी

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा पेट्रोल, डिझेल, इथेनॉल आणि इलेक्ट्रीकपाठोपाठ आता चक्क हायड्रोजनवर कार चालविण्यात येणार आहे. येत्या १६ मार्चला नवी दिल्ली येथे केन्द्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या हायड्रोजन कारचे लोकार्पण होणार आहे.  नितीन गडकरी यांनीच रविवार) ही माहिती नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी युरोपमध्ये हायड्रोजनवर रेल्वे चालविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर आता भारतात हायड्रोजनवर कार चालविण्यात येणार आहे. त्यामुळे देशात हायड्रोजन निर्मिती क्षेत्रात वाढ होणार असल्याने रोजगार निर्माण होतील. गडकरी यांनी सांगितले की, येत्या १६ मार्च रोजी दिल्लीत माझी देशातील पहिली हायड्रोजन कार मी चालवणार आहे. पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून या गाडीत वापरण्यात येईल. सांडपाण्यातून हायड्रोजन वेगळा करणेही शक्य आहे. नागपूर महापालिकेला असा एखादा प्रकल्प उभारता येण्याची शक्यता तपासून पाहाण्यास सांगितले आहे. असे झाल्यास विदर्भ हायड्रोजन निर्मितीचा हब होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.

येत्या १२ ते १४ मार्च दरम्यान एमएसएमईतर्फे हिंगणा औद्योगिक वसाहतीत खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या खासदार महोत्सवात विदर्भातील सर्व आमदार व खासदारांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्याघ्र  प्रकल्पांमधून इलेक्ट्रिक कार वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पत्र परिषदेला एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेवार उपस्थित होते.

सौर उर्जेसाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळत नाही… 

सौर उर्जा हा स्वत पर्याय आहे. आजघडीला सौर उर्जा अडीच रूपये यूनिट आहे. ३८ टक्के वीज निर्मिती सोलरवर आहे. पण, सोलर उर्जा १०० टक्के झाल्यास महावितरणची महागडी वीज कोणी घेणार नाही. म्हणून राज्य सरकार सौर उर्जा निर्मितीत सहकार्य करीत नाही, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  व्यक्त केली.

यापूर्वीही आम्ही प्रत्येक उद्योजकाने त्याच्या कारखान्यात सोलर पॅनेल लावायची योजना आणली होती. पण, स्‍वस्‍त सौर उर्जा मिळाल्यास महागडी वीज कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे राज्य सरकारकडून सहकार्य मिळाले नाही. तरीही प्रत्येक उद्योजकाने त्याच्या कारखान्याच्या छतावर सोलर पॅनेल लावून स्वत:ची वीजेची गरज भागवावी, असे आवाहन गडकरींनी केले.
आपल्याकडील कच्चा माल वापरून इतर देश श्रीमंत होतात. त्यापेक्षा आपल्याकडील कच्चा माल निर्यात करण्याऐवजी येथेच त्यावर प्रक्रिया करून वस्तू निर्मिती केल्यास आपण स्वयंपूर्ण होऊ. कापूस, संत्रा, खनिजे, सीएनजी अशा अनेक गोष्टींवरील प्रक्रिया उद्योग येथे उभे राहू शकतात. आपल्या संरक्षण उत्पादन कारखान्यात अनेक आधुनिक यंत्रसामग्री आहे. त्याचा उपयोग सीएनजी सिलिंडर निर्मितीसाठी सहज होऊ शकतो. अशा अनेक शक्यता खासदार औद्योगिक महोत्सवातून तपासल्या जाईल, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचलं का?

Back to top button