

नागपुर ; पुढारी वृत्तसेवा दहावीची तोंडी परीक्षा देऊन जाताना विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत एकाच दुचाकीवरून कन्स्ट्रक्शन साईटवर जाताना झालेल्या अपघातात येथील डीपीएस आर्मी पब्लिक स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोलपंपासमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला, तर दोन विद्यार्थी जखमी झाले. दिशांत महादेव पटेल हे मृताचे नाव आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळ गाठून जखमी विद्यार्थ्यांना लाईफ लाईन दवाखान्यात भरती केले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यातील दिशांत पटेल हा आयजी डॉ छेरिंग दोरजे यांच्या ड्रायव्हरचा मुलगा असल्याचे समजते. यशोधरा नगर पोलिस ठाण्यातंर्गत त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू होते. शाळेतून तोंडी परीक्षा देऊन तिघेही एकाच बाईकवरून कन्स्ट्रक्शन साईटवर जात होते त्यावेळी हा अपघात झाला.