गडचिरोलीच्या दोन विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकल्या | पुढारी

गडचिरोलीच्या दोन विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकल्या

पुढारी वृत्तसेवा, गडचिरोली : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यामधील युक्रेनमध्ये गडचिरोली शहरातील दोन विद्यार्थिनी युक्रेनमधील एका शहरात अडकल्या आहेत. दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोघीही युक्रेनची राजधानी कीव्ह येथे अडकल्या आहेत.

कीव्ह सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील व्हिनित्सिया येथील व्हिनित्सिया नॅशनल युनिव्हर्सिटीत या दोघी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. दिव्यानी ही एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला, तर स्मृती प्रथम वर्षाला आहे. दिव्यानी ही आपल्या मैत्रिणींसह व्हिनित्सिया शहरातील एका भाड्याच्या खोलीत राहते, तर स्मृती ही वसतिगृहात राहत आहे.

या शहरात तेवढी भीषण परिस्थिती नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर युद्धाचे सावट असल्याने स्मृती सोनटक्के हिने ४ मार्चच्या विमानाचे तिकिट काढले होते. मात्र युद्ध सुरु झाल्याने सर्व विमाने बंद आहेत. अशातच काल (ता.२४) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये नेणाऱ्या कंत्राटदाराने भोजन व अन्य जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करुन ठेवण्याचा निरोप या विद्यार्थिंनींना दिला. त्यानुसार त्यांनी सर्व वस्तूंची जमवाजमव करुन ठेवली आहे. परंतु परिस्थिती आणखी चिघळत असल्याने आणि विमाने बंद असल्याने वसतिगृहातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. यासंदर्भात विद्यार्थी आणि त्यांचे कंत्राटदार भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती प्रा. रमेश सोनटक्के यांनी दिली.

युद्धाची स्थिती बघता व्हिनित्सिया शहरात दररोज सायरन वाजवला जात असून, पोलिसांनी युक्रेनचे नागरिक आणि महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले आहे. तेथील शासनाने या विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परतण्यास सांगितले आहे. परंतु या विद्यार्थ्यांसमवेत युक्रेनमधील काही पुरुष आणि महिला आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आहेत. हे सर्व विद्यार्थी सोबत असलेले युक्रेनचे नागरिक आणि बालकांसोबत खूपच मिसळले आहेत. त्यामुळे त्यांची खूप दया येते. त्यांना सोडून जावंसं वाटत नाही, असे दिव्यानीने सांगितल्याचे तिचे वडील सुरेश बांबोळकर यांनी सांगितले.

 दैनिक पुढारीचा विशेष अग्रलेख : सदुपयोग-दुरुपयोग

हेही वाचलत का ?

Back to top button