चंद्रपूर : शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू ; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप | पुढारी

चंद्रपूर : शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू ; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.16) सायंकाळी घडली. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपचाराकरीता हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. घटनेनंतर बराच वेळ वैद्यकीय महाविद्यालयात तणावपूर्ण वातावरण होते.

अधिक माहिती अशी, वरोरा तालुक्यातील मजरा येथील मनीषा किशोर दिवे या  संतती नियमनाची शस्त्रक्रियेसाठी बुधवारी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्‍या.  शस्त्रक्रियेपूर्वी त्‍यांना इंजेक्शन दिले. यानंतर त्‍यांची प्रकृती खालावली. त्‍यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचारावेळी हलगर्जीपणा केल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचा आराेप मनीषा दिवे यांच्‍या नातेवाईकांनी केला. उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणीही त्‍यांनी केली.

या घटनेची माहिती युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात येवून आरोग्य यंत्रणेच्या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयात घोषणाबाजी केली. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

 

Back to top button