मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारकडे गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करत असलेल्या मराठा समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची तलवार उपसली आहे. राज्य सरकारने मागण्या तडीस न्याव्यात म्हणून २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात एकट्यानेच बेमुदत उपोषण करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, मराठा समाजाचे समन्वयक आणि समाजाने आंदोलनाच्या ठिकाणी येऊ नये, असे आवाहनही त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्या हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. शाहु महाराजांनी आरक्षण देताना अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी शाहु महाराजांची भूमिका ही बहुजन समाजाला शिक्षण व नोकरी मिळावे, ही होती. एक दिवस सर्वजण सुशिक्षित झाल्यावर आरक्षणाची गरज भासणार नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. आज तशी परिस्थिती नाही. म्हणूनच मराठा समाजाला सुरक्षित, सक्षम करायचे असेल, तर या प्रमुख मागण्या मार्गी लावाव्या लागतील. मात्र तशी सरकारची इच्छा दिसत नाही. परिणामी, मागण्या मार्गी लागत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.