अमरावती : आयुक्तांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आमदार रवी राणांसह १० जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

अमरावती : आयुक्तांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आमदार रवी राणांसह १० जणांवर गुन्हा दाखल

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाही फेकल्या प्रकरणात आमदार रवी राणांसह १० जणांवर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

राजापेठ अंडरपास येथे आयुक्त आष्टीकर पाहणी करीत असताना नियोजनपूर्वक कमलकिशोर मालानी यांनी तीन महिला तसेच महेश मुलचंदानी, सुरज मिश्रा, संदीप गुल्हाने, अजय बोबडे, अजय मोरया, विनोद येवतीकर यांच्या मदतीने आयुक्तांसोबत सोबत धक्काबुक्की केली.

आयुक्त आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकून शासकीय कामात अडथळा आणला. त्याचप्रमाणे शासकीय वाहनावर पेचकस सारखे तीक्ष्ण हत्यार मारून टायर पंक्चर केले. आयुक्तांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आमदार रवी राणा यांनी 3 फेब्रुवारी रोजी आयुक्तांना येडपट आहे, त्याला कवडीची अक्कल नाही, आष्टीकर नवीन आहेत असा समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, अशा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार रवी राणा, कमलकिशोर मावांनी, महेश मुलचंदानी, सुरज मिश्रा, संदीप गुल्हाने, अजय बोबडे, अजय मोरया, विनोद येवतीकर व तीन महिला असे एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलिसांनी अकरा जणांविरोधात कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, १०९, १२० (ब), ४२७, ५००, ५०१ नुसार गुन्हा दाखल केला.

मनपा कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करीत आज सकाळी ११ वाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करीत लेखणी बंद सुरू केले आहे. शनिवार १२ फेब्रुवारी पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. महापालिका शाळांमधील शिक्षकांनी देखील शनिवार पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button