बंडातात्या कराडकरांनी मारली पलटी ! म्हणाले, चुकलं असेल तर मी माफी मागतो, विषय वाढवू नका | पुढारी

बंडातात्या कराडकरांनी मारली पलटी ! म्हणाले, चुकलं असेल तर मी माफी मागतो, विषय वाढवू नका

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : आमदारांची पोरं, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी (दि. ३) सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यामध्ये केले आणि दुपारी इंदापूर तालुक्यातील गोतोंडीत त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.

“ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला”, अस कराडकर म्हणाले. ‘मी सकाळी विविध विषयांवर बोललो, पण तुम्ही फक्त तेवढेच दाखवले. तुम्ही पत्रकारांनी त्याचे भांडवल केले”, असेही स्पष्टीकरण त्यांनी सांगितले.

कराडकर पुढे म्हणाले की, “तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळे माहीत आहे आणि उभ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे कोण दारू पिते. त्यात काही विशेष नाही. सरकार दारू प्या म्हणतेय, कारण सरकारला त्यामधून महसूल मिळतो.”

काय म्हणाले होते ह.भ.प. बंडातात्या कराडकर?

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले, राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावे देखील आहेत. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर नाचतानाचे फोटो देखील आहेत. फोटो शोधले तर नक्की सापडतील असा त्यांनी खळबळजनक आरोप केला. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा असल्याची सडकून टीका यावेळी बंडातात्यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्यावतीने साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी दंडवत दंडुका आंदोलनाला पोलिसानी मज्जाव केल्याने वारकरी आणि पोलिसांच्यात काहीकाळ शाब्दिक चकमक उडाली. यादरम्यान वारकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमलेल्या वारकऱ्यांनी पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध करत रस्त्यावरच दंडवत घालत प्रशासनाचा निषेध केला.

सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून हा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी तो तातडीने मागे घेण्यात यावा या मागणीसाठी व्यसनमुक्त युवक संघ यांच्यावतीने आणि बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे हातात लाकडी दांडू घेऊन दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तसेच या सरकारने ऐकलं तर ठिक अन्यथा हातात घेतलेला दंडुका सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी दाखवण्यात येईल असा इशारा यावेळी कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी दिला आहे.

Back to top button