‘देव’माणूस रमेश देव | पुढारी

‘देव’माणूस रमेश देव

‘देव’माणूस

मराठी चित्रपटसृष्टीचा देव पुरुष अशा शब्दांत रमेश देव यांची नोंद घेतली जाते. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास या देवाचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. रमेश देव यांच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक राजबिंडा अभिनेता आणि खलनायक मिळाला. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अत्यंत सरस आणि अविस्मरणीय चित्रपट दिले. 1951 साली ‘पाटलाची पोर’ या सिनेमातून रमेश देव रुपेरी पडद्यावर दाखल झाले. ही भूमिका छोटी पण कायम लक्षात राहील. त्यानंतर 1956 साली राजा परांजपे यांच्या ‘अंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी पहिल्यांदा मुख्य खलनायक रंगवला. येथून त्यांचा अभिनयाचा जो प्रवास सुरू झाला तो एक पर्व निर्माण करणारा ठरला. अनेक चित्रपटांमध्ये खलनायक रंगवूनही रमेश देव यांचे रुबाबदार व्यक्‍तीमत्त्व होते. मराठी रसिकांच्या मनावर कायम ठसलेले असे. त्या काळात मुलींचा जीव भाळावा आणि महिला वर्गाने प्रेमात पडावे, असा हा एकमेव खलनायक होता.

राजश्री प्रोडक्शनच्या ‘आरती’ सिनेमातून रमेश देव यांनी 1962 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जिवंत अभिनयामुळे सर्वांनीच त्यांची दखल घेतली. 1971 मध्ये आलेला ‘आनंद’ हा चित्रपट त्यांच्या करियरला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा ठरला. ही भूमिका त्यांना कशी मिळाली याचाही किस्सा आहे. रमेश देव हेमंत कुमार यांच्या ‘बीस साल पहले’ सिनेमाचे शूटिंग करत होते. भूमिका खलनायकाची होती. एक दिवस भरपूर मोठा सीन, बरेच संवाद आणि वेगवेगळे मुद्रा अभिनय असा प्रसंग रमेश देव यांनी एकाच टेकमध्ये परफेक्ट दिला. तिथे उपस्थित एकाने त्यांचे भरभरून कौतुक केले. मग हेमंत कुमार यांनीही त्या व्यक्‍तीला रमेश देव यांच्या मराठीतील कामाबद्दल सांगितले. मराठीत आघाडीचे अभिनेते असूनही रमेश देव हिंदीत लहान आणि नकारात्मक भूमिका करतात, याचे त्यांना आश्‍चर्य वाटले.

काही दिवसांनी देव यांना एक फोन आला आणि दुसर्‍या दिवशी भेटायला बोलावले. रमेश देव अर्धा तास आधीच पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळले की आपण ज्या अनोळखी व्यक्‍तीस भेटण्यास आलो ते दुसरे तिसरे कुणी नसून ख्यातनाम चित्रपट निर्माता ऋषिकेश मुखर्जी आहेत. याच भेटीत मुखर्जी यांनी रमेश देव आणि सीमा देव यांना ‘आनंद’ चित्रपटातील डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि सुमन कुलकर्णी या विवाहित जोडप्याची भूमिका दिली आणि हीच भूमिका रमेश व सीमा देव यांची कायमची ओळख बनली.

रमेश देव यांनी 300 हून अधिक हिंदी चित्रपट 200 च्या वर मराठी चित्रपट आणि 40 हून अधिक मराठी नाटके केली. आपल्या अविश्रांत मेहनतीतून आणि कसदार अभिनयातून रमेश देव यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे देवपण कमावले. आजही त्यांना श्रद्धांजली वाहताना ‘देव माणूस’ असेच यथार्थ वर्णन करण्यात येत आहे.

Back to top button