नाना पटोले यांच्या विरोधात नागपुरात भाजपचे ठिय्या आंदोलन | पुढारी

नाना पटोले यांच्या विरोधात नागपुरात भाजपचे ठिय्या आंदोलन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदार कृष्णा खोपडे हे देखील आज कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा घेऊन लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी कृष्णा खोपडे यांनी नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज भाजपने आंदोलन केले. यावेळी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांवर दबाव असून आम्ही कोर्टात जाऊ पण नाना पटोलेंना सोडणार नसल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते नागपुरातील कोराडी पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलनाला बसले होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्यावर जो पर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तो पर्यंत पोलीस स्टेशन समोर धरणं आंदोलन करण्याचा निर्धार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळे यांच्यासोबत भाजपाचे दिडशे ते दोनशे कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली. देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोलेंच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

Back to top button