हिंगोली/चोंढी, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील (हिंगोली) चोंढी आंबा येथील चोंढी टी पॉईंटवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जाऊन तीन चोरट्यांनी बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न दिल्याने चोरट्यांनी पलायन केले. यावेळी चोरट्यांनी बँकेच्या काचेवर दोन राऊंड फायर केले. यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी काच फुटल्याने रोखपाल जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहेत. शुकवारी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील (हिंगोली) चोंढी आंबा टी पॉईंटवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. शुक्रवारी दुपारी खातेदारांचे व्यवहार आटोपून बँकेचे अधिकारी इशान खिस्ते, रोखपाल नितीन ननवरे व सेवक भद्रदीप सरोदे हे काम करीत होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिघे जण बँके समोर आले. त्यापैकी दोघे जण बँकेत शिरले तर एक जण बँकेबाहेरच थांबला.
यावेळी बँकेत गेलेल्या दोघांनी हातातील बंदूक दाखवून इशान खिस्ते यांना धमकावून बँकेत काय आहे ते देण्याबाबत दरडावले. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न दिल्याने चोरट्यांनी बँकेतून काढता पाय घेतला. मात्र बँकेतून जातांना चोरट्यांनी दोन राऊंड फायर केले. मात्र राऊंड चॅनल गेटला लागल्यामुळे कुठलेही नुकसान झालं नाही, मात्र बँकेची काच फुटून लागल्याने रोखपाल ननवरे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक किशोर कांबळे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे, करवंदे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेतील माहिती घेण्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.