वर्धा : आर्वीच्या कदम हॉस्पिटलमध्ये सापडल्या ११ कवट्या, ५४ हाडे  | पुढारी

वर्धा : आर्वीच्या कदम हॉस्पिटलमध्ये सापडल्या ११ कवट्या, ५४ हाडे 

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या आर्वी येथील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन तरुणीचा गर्भपात केल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामध्ये पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून, रुग्णालयात तपासणी केली असता, रुग्णालयाच्या आवारातील गोबरगॅसच्या खड्ड्यात काही हाडे आणि कवट्या सापडल्यात. यामध्ये ११ कवट्या, ५४ हाडे जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी आजवर डॉ. रेखा कदमसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाच्या तपासकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्वी येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी दोन जणांसह डॉ. रेखा कदम यांना अटक केली होती. डॉ. कदम यांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांकडून रुग्णालयात तपासणी करण्यात आली.

रुग्णालयात तपासणी करताना मागील परिसरात खोदकाम करण्यात आले. त्यामध्ये गोबरगॅसच्या खड्ड्यात खोदकाम करण्यात आले असता, ११ कवट्या, ५४ हाडे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे अवशेष वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झालेली आहे. येथील सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी करीत आहेत. वर्ध्याचे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके यांच्यासह अधिकार्‍यांनी दवाखान्यात पाहणी केली. प्रकरणाची माहिती घेतली.

याबाबत पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी माध्यमांशी बोलताना, रुग्णालयाच्या आवारात खोदकाम करण्यात आले. त्यामध्ये काही अवशेष मिळून आलेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत ते सिझ केले. येथील रजिस्टर जप्त करण्यात आले आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल, असे सांगितले. आवश्यकता भासल्यास मिळालेले कवट्या, हाडांचे अवशेष यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button