बोरी : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या | पुढारी

बोरी : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा : बोरी (ता. इंदापूर) येथील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तीन मुलांकडून वारंवार होणाऱ्या त्रासास कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तिघांवर आत्महेत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. सिध्दी गजानन भिटे (वय-१५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

याप्रकरणी मुलीचे वडील गजानन पांडुरंग भिटे (वय ४२) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश उर्फ जी.के.संतोष कुचेकर (वय २४), यश अरुण गरगडे (वय १८, रा. दोघे बोरी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. तिघांपैकी एक जण अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धी गावातील बोरी हायस्कुल बोरीमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत होती. शाळेमध्ये ये-जा करीत असताना गावातील तिघे जण तिची टिंगल टवाळी करुन छेड काढत होते. सिद्धीने या घटनेचे घरी माहिती दिल्यानंतर सिद्धीच्या वडील गजानन यांनी तिघांच्या घरी जावून त्यांच्या आई-वडिलांना छेडछाडीबद्दल माहिती दिली होती.

छेडछाडीचा प्रकार न थांबल्याने बुधवारी (ता.१२) रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिद्धीने घरातील लोखंडी एंगलला साडीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. वारंवार होणाऱ्या त्रासास कंटाळून आत्महत्या करीत आहे असे त्यात लिहीले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांजणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत आहेत.

हे वाचलंत का? 

Back to top button