यवतमाळ : वैद्यकिय अधिकार्‍याच्या मारेकर्‍यास शोधण्याचे पोलीसांपुढे आव्हान | पुढारी

यवतमाळ : वैद्यकिय अधिकार्‍याच्या मारेकर्‍यास शोधण्याचे पोलीसांपुढे आव्हान

उमरखेड, पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची मंगळवारी सायंकाळी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या घटनेला २४ तास उलटुनही मारेकर्‍याचा सुगावा लागू शकला नाही. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून उमरखेड तालुक्यातील सर्व शासकीय व खासगी दवाखाने तसेच औषधी दुकान बंद ठेवण्यात आली आहेत.

मंगळवारी सायंकाळी डॉक्टर हनुमंत धर्मकारे हे उत्तरवार शासकीय रुग्णालय शेजारील गोरखनाथ हॉटेलच्या बाहेर पडले. यावेळी पाळतीवर असलेल्या अज्ञातांनी चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तात्काळ घटनास्थळ भेट देवून चौकशी सुरु केली.

आरोपीचे शोध कार्य करण्यासाठी दहा पथके रवाना झाल्याची माहिती दिली आहे. तसेच घटनास्थळी श्वान पथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट पथक, फॉरेन्सिक लॅब पथक न्यायवैज्ञानिक शाळा पथक तुळजापूर यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतः पोलीस अधिक्षक डॉ, दिलीप भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव दरणे येथे तळ ठोकून आहेत.

दरम्यान काल रात्री उशिराने डॉ, हनुमंत धर्मकारे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. यानंतर आज बुधवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांना देण्यात येत होता. परंतु, मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक  होत नाही तोपर्यंत नातेवाईक व समाज बांधवांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

या काळात उमरखेड पोलिस प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या तपासणी केल्या. त्यामधून आरोपीने ढाणकी रोडने पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानुसार वरील सर्व पथकेही मराठवाड्याकडे रवाना झाली आहेत.

या घडलेल्या घटनेमुळे उमरखेड येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली आहेत. तर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषधी दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांना निवेदन देऊन आरोपीच्या तात्काळ मुसक्या आवळून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे या घटनेचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button