

ठाणे : प्रवीण सोनावणे
राज्यात सर्वच ठिकाणी एकीकडे बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील येऊर परिसर अद्याप याला अपवाद ठरले आहे. मात्र, असे असले तरी, या परिसरातील वाढती अनधिकृत बांधकामे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या यामुळे जंगल क्षेत्रात नागरी वावर वाढला असून यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे येऊरमध्येही बिबट्यांचे हल्ले वाढण्याची भीती येऊरमधील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
संध्याकाळी 7 नंतर ग्रामस्थ सोडून इतर बाहेरच्या नागरिकांना येऊरमध्ये प्रवेश निषिद्ध असतानाही सर्रासपणे बाहेरच्या नागरिकांना प्रवेश दिला जात असल्याने वन विभागाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतामध्ये तसेच राहत्या वस्तीमध्ये घुसून बिबट्यांचे माणसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. राज्यातील इतर ग्रामीण भागात बिबट्यांवर हल्ले होण्याची कारणे वेगळी आहेत.
नाशिक, पुणे, नगर आणि इतर भागात बिबट्यांचे जे हल्ले झाले त्यांची करणे वेगळी असून या ठिकाणी जंगल क्षेत्र कमी असून शेती क्षेत्र जास्त असल्याने शेतीलाच बिबटे जंगल समजत असल्याने तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंधारे असल्याने या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. परिणामी या बिबट्यांचे माणसांवरील हल्ले वाढले आहेत. इतर राज्याच्या तुलनेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची परिस्थिती वेगळी आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे तब्बल 10 हजार हेक्टरमध्ये विस्तारले असून यामध्ये येऊर परिसर हे जवळपास 6 हजार हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे. या ठिकाणी अद्याप बिबट्याचे मोठे हल्ले होऊन अद्याप कोणाला आपला जीव गमवावा लागला नसला तरी, भविष्यात मात्र हे हल्ले वाढण्याची भीती येऊरमधील स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असूनही येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे, हॉटेल्स, पब उभे राहिले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या पार्ट्या सुरू असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वावर वाढला आहे.या सर्व प्रकारावरून उच्च न्यायालयाने अनेकवेळा वन विभाग आणि ठाणे महापालिकेवर ताशेरे ओढले असतानाही परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा झालेली नाही. जंगलामध्ये मानवी वावर वाढला असल्याने बिबट्यांच्या मुक्त संचारावर बंधने आली आहेत.
याशिवाय अन्नाच्या वासाने ते जंगलातून मानवी वस्तीमध्ये येण्याची शक्यता वाढली असल्याने भविष्यात या ठिकाणीही बिबट्याच्या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. परिणामी संध्याकाळी 7 नंतर येऊरमध्ये जो प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशी मागणी वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
वन विभागाच्या काय आहेत उपाययोजना...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे 10 हजार हेक्टरमध्ये पसरले असून येऊरचा परिसर हा 6 हजार हेक्टरमध्ये पसरला आहे. जंगल परिसर हा पूर्णपणे संरक्षित करण्याच्या दृष्टीने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच येऊर परिसरातच कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठे बांधण्यात आल्याने यासाठी बिबटे मानवी वस्तीत येऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बिबट्यांवर नजर ठेवण्यासाठी टॉपच्या कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार असल्याची माहिती वन अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली आहे.
क्षमतेपेक्षा बिबट्यांची संख्या जास्त...
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचे पुनर्वसन करण्यात येत असून या ठिकाणी 25 बिबट्यांची क्षमता आहे. मात्र या परिसरात बिबट्यांची संख्या ही 35 ते 40 च्या घरात असून या ठिकाणी देखील क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याचे उघड झाले आहे.