

ठाणे : तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात आकाराला येत असताना राज्य सरकारने चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात विकसित कारण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदराला जोडून 552 चौरस किमी परिघात ही मुंबई आकाराला येत असून याला जोडून असलेला समुद्राच्या पाण्यावर साकारत असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन आणि द्रुतगती महामार्ग अशा अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
या चौथ्या मुंबईच्या विकासासाठी रस्ते विकास महामंडळ पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. पालघर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले पालघर आणि ज्या तालुक्यात वाढवण बंदर होत आहे, तो डहाणू तालुका चौथ्या मुंबईच्या केंद्रस्थानी आहे. मुख्य मुंबई शहरावर आणि नवी मुंबई, ठाणे या शहरांवर सध्या असलेला भार कमी करण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची निर्मिती केली जात आहे. रस्ते विकास महामंडळ ही विकास संस्था ही चौथ्या मुंबईच्या विकासासाठी प्रमुख एजन्सी असणार आहे.
मुख्य मुंबईपासून 140 किमी अंतरावर गुजरातच्या सीमेला लागून ही चौथी मुंबई आकाराला येत आहे. मुंबई हे अनेक बेटांमधून तयार झालेले शहर आहे. यामध्ये पश्चिम उपनगरे, कुर्ला बांद्रा कॉम्प्लेक्स असे भाग विस्तारले आहेत. मात्र मुंबई आणि ठाण्यावर प्रामुख्याने वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. 25 लाखांच्या ठाणे शहरात 16 लाख वाहने आहेत. आणि मुंबईत तर 3.29 कोटी लोकसंख्या आणि जवळपास 2 कोटी वाहने आहेत. त्यामुळे या शहराला भार सोसवेना, अशी इथल्या रस्त्यांची अवस्था आहे. परिणामी मुंबईचे विस्तारीकरण हे अत्यावश्यक झाले आहे.
चौथ्या मुंबईमध्ये मुंबई एवढ्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सरकारने अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वाढवण हे भरतील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनन्स असलेले बंदर असणार आहे. यासाठी 76 हजार 220 कोटींची गुंतवणूक केली जात आहे. तसेच अंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ, हायस्पीड बुलेट ट्रेन आणि किनारी रस्त्यांचे जलद जाळे यासाठी नवे व्हिजन तयार करण्यात आले आहे.
चौथ्या मुंबईतून मुंबईत येण्यासाठी हायस्पीड रेल्वेने केवळ 30 मिनिटाचा कालावधी लागणार आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरील सर्वात विकसित जिल्हा म्हणून पालघरची ओळख करून देणाऱ्या या चौथ्या मुंबईत स्मार्ट सिटीचे प्रकल्पही साकारणार आहेत. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जगभरातून गुंतवणूक घेतली जाणार आहे.
चौथ्या मुंबईमध्ये तिसऱ्या मुंबईपेक्षा दळणवळणाची सुपर कनेक्टिव्हीटी असणार आहे. समुद्राच्या पाण्याची खोली 20 मीटरपेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी देशातील एकमेव नैसर्गिक बंदर वाढवण साकारत आहे. या ठिकाणी अजस्त्र कंटेनर सहज वाहून आणता येणार आहे. 298 मिलियन टन क्षमतेचे हे जगातील 13 व्या क्रमांकाचे बंदर असणार आहे.
कोळसा,सिमेंट, केमिकल, तेल याची वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल. 10 कंटेनर पोर्ट या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे देशाच्या यादीत या बंदराचा नंबर एक असणार आहे. वसई-विरारपासून पुढे पालघर, डहाणू अशा कोस्टल भागाला जोडून ही चौथी मुंबई विकसित होईल. त्यामुळे आता मुंबई एवढीच महत्वाची ही चौथी मुंबई विकसित झालेली पाहायला मिळेल.
नीती आयोगाने मुंबई महानगराला एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी मुंबईचा विस्तार हा गतिमान केला जाईल. या चौथ्या मुंबईत डहाणू तालुक्यातील 11 गावे, पालघरमधील 25 आणि वसई, जव्हार, तलासरी अशी मिळून 107 गावांच्या क्षेत्रात ही चौथी मुंबई विकसित होईल. वाढवण बंदरातून येणारा माल साठवण्यासाठी लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहे.
पाच पंचतारांकित हॉटेलचे प्रकल्प देखील तयार होणार असून मनोरंजनासाठी रिक्रिएशन ग्राउंड तयार केले जाणार आहे. तसेच कन्व्हेंशन सेंटरची निर्मिती देखील केली जाणार आहे. याबरोबरच रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉर देखील असणार आहे. हेलिपॅड, एअरट्रीप उभारण्याचे नियोजन आहे.
विकास आराखड्याचे स्वरूप...
एमएमआरडीएने 33.88 चौरस किमी क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत जमीन वापर नकाशा, अधिसूचित क्षेत्राचे सर्व्हेक्षण, तांत्रिक अभ्यास करण्यात येत आहे. त्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत. या मुंबईच्या केंद्रस्थानी वाढवण, आंबीस्ते, वसगाव, यासह 107 गावे आहेत. या प्रकल्पामुळे पालघरचे भाग्य बदलणार आहे.
“ या चौथ्या मुंबईच्या आकर्षणात ऑफशोर एअरपोर्ट हे महत्वाचे केंद्र असणार आहे. कोस्टल रोडचा देखील विस्तार होणार आहे. आणि मेडिकल कॉलेज,अत्याधुनिक रुग्णालय,10 लाख रोजगारांची निर्मिती,मासेमारी संरक्षणासाठी स्वतंत्र सुविधा केंद्र,कौशल्य विकास केंद्र,स्मार्ट सिटी यासाठी सरकारने आखणी केली आहे. चौथ्या मुंबईच्या निर्मितीसाठी 56 कंपन्यांशी करारही करण्यात आला आहे“.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री