

नेवाळी : डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावरील काटई गावाजवळ एमआयडीसी क्षेत्रात सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या ऐरोलीकाटई नाका एलिव्हेटेड रस्त्याच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. बदलापूरच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा एअर वॉल जेसीबीच्या धक्क्याने फुटल्याने परिसरात अक्षरशः जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि महापे औद्योगिक परिसराचा पाणीपुरवठा तात्काळ खंडित करावा लागला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता औदुंबर आलहट यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, एलिव्हेटेड रस्त्याच्या कामात जेसीबी मशीनचा धक्का जलवाहिनीच्या एअर वॉलला लागल्याने हा प्रकार घडला आहे. मात्र, एवढ्या संवेदनशील जलवाहिनीच्या ठिकाणी काम करताना आवश्यक ती खबरदारी का घेतली गेली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जलवाहिनी फुटताच प्रचंड दाबाने पाणी बाहेर फेकले गेले. काही वेळातच डोंबिवली-अंबरनाथ महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. काटई नाका ते खोणी गाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी परतीच्या मार्गावर असणारे आणि कामावर जाणारे नागरिक, कामगार व वाहनचालकांना अक्षरशः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. अखेर एमआयडीसीने जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर महामार्गावरील पाणी ओसरू लागले असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी अवधी लागणार
या घटनेचा फटका सामान्य नागरिकांसह औद्योगिक क्षेत्रालाही बसला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘विकासकामांच्या नावाखाली मूलभूत सुविधा धोक्यात येत असतील, तर जबाबदार कोण?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, एमआयडीसीकडून सायंकाळी सुमारे सहा वाजता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ही दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी किमान पाच तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, या प्रकारामुळे झालेल्या हालअपेष्टा आणि निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.