

कृष्णा जाधव : मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
आत्मसत्तेवर अज्ञानाने कल्पिलेले देह निर्माण होतात आणि नाश पावतात. आत्मा कधीही वाढत व कमी होत नाही. केवळ विद्वत्तेच्या, ज्ञानाच्या द्वारे भगवत् प्राप्ती होऊ शकत नाही, विद्वत्तेला वैराग्याच्या दिलेल्या जोडीशिवाय भगवत् प्राप्ती अशक्य, वैराग्याद्वारे समत्वाचा पुरस्कार त्याशिवाय विश्वात्मकाचे दर्शन अशक्य. म्हणजेच भक्ती-ज्ञान-विवेक-वैराग्य-समत्व या वारकरी संप्रदायाच्या पंचसुत्रीचा पुरस्कार हा भगवत् दर्शनासाठी आवश्यक आहे. याविषयी आपण गतलेखात चिंतन केले होतं. भगवंत कुठे आहे आणि कुठे नाही याविषयी आजच्या लेखात विचारमंथन.
॥ श्री ॥
पंधराव्या अध्यायामधील ‘पुरुषोत्तम योगाचे’ चिंतन आपण करत आहोत. अनेक लेखातील चिंतनामधून माऊली कृपेने मी अध्यात्म तत्त्वज्ञानाचं ‘पान’ तुमच्या समोर अत्यंत मनोभावे वाढत आहे. त्याचं रसग्रहण करताना अनेक तत्त्वांमधील नाविन्यपूर्ण चवींचा आपण सर्वांनी आस्वाद घेत ‘आत्मानुभूतीला’ तृप्त करावं, असं अत्यंत विनयाने आवाहन करतो आहे.
केवळ... शास्त्रार्थांच्या पोपटपंचीनं... आगी मुखोत्गत संस्कृत सुभाषितासहित चार वेद, अठरा पुराणं व सहा शास्त्रांवर चर्चासत्र आयोजित करून भगवत्प्राप्ती होणार नाही. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे स्थान माऊली ‘चित्त शुद्धीला’ देतात. अंतःकरणातील निर्मळ, सोज्वळ, सात्विक भाव हेच; श्रेष्ठ; असल्याचं चिन्ह. शुद्ध भाव जिथे आहे तिथेच देव उभा आहे. शुद्ध भाव जिथे आहे तिथेच ज्ञान, विवेक, भक्ती, वैराग्य आणि साम्यभाव हात जोडून उभे असतात.
शुद्ध भाव जिथे आहे तिथे चित्तामधील अहंकार थांबूच शकत नाही, जसा सूर्याच्या अस्तित्वात अंधःकार येऊच शकत नाही. म्हणूनच वारकरी संप्रदायातील प्रत्येक साधकाचे ‘चित्तशुद्धी’ हे अंतिम ध्येय. याचा प्रत्यय संप्रदायातील प्रत्येक सत्पुरुषाच्या जीवन चरित्राचा अभ्यास केल्यास प्रकर्षाने जाणवतो. माऊलींनी मांडलेल्या तत्त्वचिंतनात आणि भागवत् संप्रदायात अढळ स्थान ‘चित्त शुद्धीला’ दिले आहे. त्यामुळेच हा संप्रदाय तळागाळापर्यंत रुजला.
येथे शास्त्रार्थ जाणणाऱ्या प्रगाढ-पंडिताला जर ‘चित्त शुद्ध’ असेल तरच सन्मान किंवा जागा मिळेल. अन्यथा तो वारकरी संप्रदायाचा उपासक नाहीच नाही. माऊलींचे तत्त्वज्ञान जीवाला शुद्ध चैतन्याकडं घेऊ न जातं. त्यामध्ये कोणताही प्रकांड पांडित्याचा अभिनिवेश असत नाही. ना आत्मप्रौढी, आत्मस्तुतीची अभिलाषा. सर्वसामान्यांना भगवत् भक्ती घडावी, सामान्यांच्या जीवनात भगवंत प्रेमाचा अमृतरस सहज साध्य व्हावा यासाठी माऊलींना; संस्कृतमधील अद्वैत साध्या, सोप्या मराठी भावार्थ दीपिकेतून ‘चिद्विलास रूपाने’ उभे केले. शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत ‘ब्रह्म सत्य आणि जगत् मिथ्या’ हा विवेकाधिष्ठीत तत्त्वसिद्धांत मांडला.
हे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहजासहजी उमगणारे नव्हते, कारण ते फक्त ज्ञानमार्गाने प्राप्त होणारे तत्त्व होते. माऊलींनी या तत्त्वास सहज सुलभ करत भक्ती-ज्ञान-प्रेम-सेवाभाव-अनुभूती आणि आत्मज्ञान या मार्गाने प्रवास करताना तुम्हा-आम्हाला ‘नामस्मरण, भक्ती, गुरुसेवा आणि आत्मानुभवाचे’ धडे गिरवायला लावत ‘चित्त शुद्धी’ यास सर्वाधिक महत्त्व दिले. शंकराचार्याचं अद्वैत तत्त्वज्ञानवृत्ती, तत्त्वचिंतन, विवेक आणि त्याग मार्गाने जाणारी तर माऊलींचे अद्वैत चिद्विलास तत्त्वज्ञान अनुभूती, प्रेम, समरसता या मार्गाने प्रवास करणारे. उभयतांचे साध्य एकच पण साधनं वेगवेगळी. माऊलींचा मार्ग हा जनसामान्यांचा व बहुजनांना भगवत् भक्तीचे नितांत सुंदर दर्शन दाखवणारा श्रेष्ठतमच होय.
वारकरी संप्रदाय हा शुद्ध आणि सात्विक तत्त्वज्ञानाचं परिपोषण करणारा संप्रदाय आहे. भूतमात्रांतील साम्यांचा जयघोष करणारा आणि जगातील मानव जातीसह चराचरांमध्ये भगवंत आहे, तो मनोभावे, शुद्ध अंतःकरणाने भजावा हाच बोध सर्वसामान्यांना दिला.
जो एक मी कां समस्ती|
व्यापक असे भूतजाती|
विश्वात्मक देव !! देवाचं विश्वात्मक रूप !! सर्वाभूती भगवंत !!! जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, आसणी, नयनी, शयनी, रूपा-अरूपात सर्वत्र साम्य भावाने जो स्थित !!! ज्याला केवळ भक्तीप्रेमाने आलिंगन देता येते !!! अशा भगवंताला भजण्याचा मार्ग तेवढाच सुबक आणि सुकर माऊलींनी करून दिला.
सर्व विश्वातील मानव समाजाला निदान या विचाराला आता स्वीकारावं लागणारं आहे. हा विचार हा कोणा एक धर्म - संप्रदायाचा विचार न राहता तो सर्वसमावेशक, सर्वव्यापी, सदा सर्वदा आनंददायी असणार आहे. याच विचाराने स्वतः सहित जगाला पाहावं अगदी “सूर्य” स्वतःलाच पाहू शकतो या न्यायाने.
रामकृष्णहरी