

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा !!!
“प्रकृती” “आत्मा” यांच्या संयोगाने निर्माण होणारे “जीवन” या तिघांच्या परस्पर संवादातून आत्मज्ञानापर्यंत जाता येते. शरीराला धारण करून “जीव” हा शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध यांचे अनंत विषय देहाच्या माध्यमातून सेवन करतो. देहाच्या माध्यमातून “मन” हेच विषयभोगांच्या पाठी आयुष्यभर धावायला लावते. मन, शरीर आणि इंद्रिये भोग यामधून “कर्मे” तयार होतात. कर्माचं फळ हे “पाप किंवा पुण्य” यांचा संचय हाच पुनर्जन्मास कारणीभूत ठरतो. या सर्व प्रवासाबाबत जो जागृत होतो तो “ज्ञानी” अशा ज्ञानी सत्पुरुषास आत्मज्ञान प्राप्त होते. याविषयी आपण गतलेखात चिंतन केलं. आजच्या लेखात मानवी जीवनातील “जीवात्म्या”बाबत जे गैरसमज आहेत त्यावर माऊलींनी टाकलेला प्रकाश.
॥ श्री ॥
मानवी जीवन ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर डोकावते. ज्ञानी होण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब विविध तत्त्वज्ञानी मंडळी करतात. सरतेशेवटी ते स्वतःच्या ठिकाणीच आहे, याचा त्या सर्वांना शोध लागलेला आहे. “आत्मज्ञानी ” हाच खरा सत्पुरुष आणि संत. त्यांना जगाच्या रहाटगाडग्यातील ज्या गोष्टीचे खरे ज्ञान झालेले असते त्या तत्त्वांचं आज आपण चिंतन करणार आहोत.
1) आत्मसत्तेवर (ब्रह्म) अज्ञानाने कल्पिलेले देह उत्पन्न होतात व नाश पावतात, ही गोष्ट ज्ञानी सत्पुुरुष निश्चित जाणतात. देह उत्पन्न होतात आणि नाश पावतात, या मध्ये देहाच्या माध्यमातून जी कर्मे घडून येतात तीच पुनर्जन्मास कारणीभूत ठरत असतात. यामुळे ज्ञानी “कर्मा”बाबत जागृत असतो. कर्मे ही देहाच्या माध्यमातून घडून येणारच आहेत. पण, त्या कर्माचा परिणाम जर शून्य करायचा असेल, तर “निष्काम कर्मयोगासारखा” दुसरा मार्ग नाही.
2) आत्मा कधीही वाढत नाही आणि कमी होत नाही. तो कोणाकडून काही करवत नाही, स्वतः काही करत नाही. हे ज्यांना यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आहे तेच जाणतात.
चैतन्य चढे ना ओहटे|
चेष्टवी ना चेष्टे|
ऐसे आत्मज्ञान चोखटे | जाणती जे ॥
आत्मतत्व अखंड जीवनाचा प्रवास “स्थितप्रज्ञाप्रमाणे” पाहत असते. जीवाच्या प्रत्येक कर्माचा त्याच्याकडे हिशोब असतो. पण, आत्मा कर्मबंधनाने बांधला जात नाही, उलटपक्षी “जीव” हाच कर्माला जबाबदार राहतो, कर्मभोग त्यालाच भोगावे लागतात. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे तो हे जाणतो.
3) एखादा पुरुष (जीव) बुद्धीमान असेल तर ज्ञान त्याच्या स्वाधिन होईल. प्रज्ञाचक्षूने त्यास अणुरेणूचे ज्ञान होईल. सकळ शास्त्रात निपुण होईल. एवढंच काय विश्वाचं ज्ञान त्याच्यासमोर उभं राहील. एवढी कक्षा ज्ञानाची रुंदावेल, असे माऊली सांगतात. माऊलींना मानवी जीवनात विज्ञानातील संशोधनाच्या माध्यमातून होणारी भौतिक, जीवशास्त्रीय, रासायनिक क्रांती आणि ज्ञानाचा स्फोट माहीत असावा. त्याशिवाय त्यांनी वरील अणुरेणूच्या संशोधनाबाबत आणि सकळ शास्त्रातील निपुणतेबाबत विचार मांडले नसते.
माऊली म्हणतात, अशी कितीही विद्वत्ता असेल तरीही भगवंताची भेट प्रज्ञावानास केवळ विद्वत्तेच्याद्वारे होणार नाही. विद्वत्तेबरोबर “वैराग्य” असायलाच हवे. वैराग्याशिवाय प्रज्ञावंतास सर्वांच्या अंतर्यामी “सम” प्रमाणात असणारा जो भगवंत आहे, तो दिसणार नाही. माऊलींनी साम्य आणि वैराग्याला वारकरी संप्रदायात याच कारणांसाठी अग्रगण्य स्थान दिलं असावे. विश्वाचं समाधान होण्यासाठी, त्या विश्वामधील प्रत्येक जड-जीवाला चैतन्याचं दर्शन घडण्यासाठी स्वधर्म समत्वाचा सूर्य अंतःकरणात प्रकाशमान व्हायलाच हवा. माऊली म्हणतात -
परि ते व्युत्पत्ती ऐसी | जरी विरक्ती न रिगे मानसी |
तरी सवत्मिका मजसी | नव्हेची भेटी ॥
साम्यतत्त्वावर किंवा साम्याच्या वीटेवर वारकरी संप्रदायाचा भगवंत (विचार) उभा आहे. म्हणूनच गेली साडेसातशे वर्षे आणि यावत्चंद्र दिवाकरौ वारकरी संप्रदायाच्या विचारांची प्रज्ञाज्योत अखंड नंदादीपासारखी तेवत राहणार आहे. याच ज्योतीच्या प्रकाशात जीवन “भक्तीमय” होणार. पांडुरंगाच्या रंगात रंगून जाणार. विरक्ती हाच संप्रदायाचा उदंड विचार संप्रदायाच्या पाठीचा “कणा” मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण मूल्ये ही साम्य आणि वैराग्य, आपण सोडून दिली? की धरून ठेवली हा चिंतनाचा विषय. पण “वारकरी संप्रदायाचे” जे पाईक आहेत; त्यांना या विचाराचं मूल्य माहीत आहे, म्हणूनच त्यांना शिरोधार्य धरून जीवनाचा प्रवास ते (वारकरी) करतात.
प्रज्ञावंत, ज्ञानी सत्पुरुष जीवाच्या आणि आत्म्याच्या देहरूप प्रवासामधील वरील 1) ते 3) मांडलेल्या तत्त्वांना जाणतात. सर्व शास्त्र-विद्येत पारंगत असूनही जर त्याच्या अंतःकरणात विषयाचेच चिंतन सुरू असेल, तर अशा विषयासक्तांना भगवंत दर्शन कधीच घडत नाही, घडणार नाही. हे माऊली ठामपणे सांगतात. लोकांना स्वतःच्या विद्वत्तेच्या माध्यमातून प्रभावीत करणाऱ्या, चित्तात अहंकार बाळगणाऱ्या ढोंगी, लबाड, पाखंडी व्यक्तीच्या मुखात सर्व शास्त्रे, पुराणे अगदी तोंडपाठ असली तरी अशा पुरुषास (जीवास) कोट्यवधी जन्मे घेऊ नही भगवंत प्राप्ती होणार नाही, माऊली भाषा अशा दांभिकाची पोलखोल करते.
पै तोंड भरों का विचारा | आणि अंतःकरणी विषयांसी थारा |
तरी नातुडे धनुर्धरा | त्रिशुद्धी मी |
तैसा चित्ती अहंतो ठावो | जिभे सकळ शास्त्रांचा सरावो |
ऐसिनि कोडी (कोटी) एक जन्म जावो |
परी न पाविजे माते ॥
रामकृष्णहरी