

ठाणे: वागळे इस्टेट येथील महापालिकेची मालमत्ता असलेल्या विरंगुळा केंद्राच्या जागी अनधिकृतपणे लॉटरीचे दुकान सुरू असल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेच्या हजारो कोटींच्या मालमत्ता असून त्या दुर्लक्षित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जनसेवकाचा जनसंवाद हा १४७वा कार्यक्रम खोपट येथील भाजपच्या कार्यालयात झाला. यावेळी वागळे इस्टेट येथील मार्ग क्र.२२ येथील रहिवाशांनी उपस्थित राहून विरंगुळा केंद्रातील अतिक्रमणाबाबत तक्रार केली.
ठाणे महापालिकेची मालमत्ता असलेल्या विरंगुळा केंद्रात अनधिकृतपणे लॉटरीचे दुकान सुरू असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. हे केंद्र महापालिकेने भाड्याने दिले आहे का, असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी दुकान सील करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
यावेळी बोलताना केळकर म्हणाले, शहरात ठाणे महापालिकेच्या सुमारे ११ हजार कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या अतिक्रमित होत आहेत, तर काहींचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला जात आहे.
कापूरबावडी येथील ठामपाचे कलाभवन सध्या बंद आहे. सहा महिन्यांपूर्वी याच्या पाहणीनंतर तातडीने दुरुस्ती करून ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांकडे केल्या होत्या, मात्र, आजतागायत ते दुर्लक्षित असल्याची खंत केळकर यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमात सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये फसवणूक झालेले बदलापूर येथील सर्वसामान्य गुंतवणूकदार देखील उपस्थित होते. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे १५० कोटींचा घोटाळा झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे.
मात्र कंपनीच्या संचालकाला जामीन मिळाला असून कारवाईची प्रक्रिया मंद गतीने सुरू आहे. याबाबत केळकर यांनी आयुक्तांशी चर्चा करून कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश द्यावेत तसेच कारवाई वेगाने व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
किसननगर येथे क्लस्टर योजना सुरू असली तरी येथील रहिवासी या योजनेबाबत संभ्रमित असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. येथील इमारती जुन्या आणि मोडकळीस आल्या असून या योजनेंतर्गत त्यांना कोणत्या इमारतीत घरे देणार आहेत, कधी देणार आहेत, असे प्रश्न रहिवाशांना पडले आहेत.
त्यामुळे या रहिवाशांना तपशीलवार माहिती देऊन त्यांना आश्वासित करावे, अशा सूचना केळकर यांनी क्लस्टर विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. कार्यक्रमास नगरसेवक सीताराम राणे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, अमित सरय्या, माजी महापौर मनोहर गाढवे, माजी उपमहापौर अशोक भोईर आदी उपस्थित होते.
झोपडपट्टीवासींच्या पाठीशी ठाम उभे राहणार...
माजीवडे येथील शिवसमर्थ गृहनिर्माण संस्थेचा एसआरए योजनेचा प्रस्ताव मंजूर करून तो एसआरए सचिवांकडे पाठवण्यात आला होता, मात्र तो प्रस्ताव परत मागविण्यात आला.
ही रहिवाशांची अडवणूक असून यात कोण राजकीय हस्तक्षेप करत आहे, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. याबाबत आयुक्तांना पत्र देणार असून या झोपडपट्टीवासींच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.