

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील नवघर तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलावात अनुक्रमे 20 नोव्हेंबर व 10 डिसेंबर रोजी विठू माऊलींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात होऊन त्यांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ठाणे येथील उपवन तलावात उभारण्यात आलेल्या 51 फुटी विठू माऊ लींच्या मूर्तीप्रमाणे मिरा-भाईंदर शहरातील 2 ठिकाणी विठू माऊ लींच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शहरातील विविध विकासकामांसाठी 1 हजार 800 कोटी रुपये आणि सीसी रस्त्यांच्या विकासासाठी 900 कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा सरनाईक यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवान आणि पारदर्शी नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच नागरिकांशी निगडीत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यांनी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाचा आढावा घेताना ते ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी खुले करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कमी निधी असतानाही पालिकेने कलादालनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने त्यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा व संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
झाडांना कोणतीही इजा न पोहोचविता पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रकल्प राबवावेत, अशी सूचना त्यांनी पालिकेला केली. शहरात विविध भाषिक भवन साकारण्यात येत असून त्यातील हिंदी, मैथिली, बंगाली व दक्षिण भारतीय भवन, महाराणा प्रताप भवनचे लोकार्पण येत्या 10 ते 12 डिसेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदी भाषेवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी शहरात हिंदी माध्यमाच्या शाळेचे काम सुरू करण्याचे निर्देश पालिकेला दिले. प्रलंबित प्रमोद महाजन कलादालन, घोडबंदर किल्ला व उपप्रादेशिक कार्यालयाबाबत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस त्यांचे लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार
शहरातील मौजे नवघर येथील आरक्षण क्रमांक 299 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच त्यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर शहर राज्याच्या शहरी विकासातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी शहरातील प्रत्येक प्रकल्प हा जनतेच्या हितासाठी राहील, असे स्पष्ट केले.
या प्रकल्पांच्या आड निधीची कमतरता, प्रशासन आणि वेळेची अडचण निर्माण होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. बैठकीत पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, प्रियंका राजपूत, मुख्य लेखापरीक्षक सुधीर नाकाडी, मुख्य लेखाधिकारी शिरीषकुमार धनवे, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे आदींसह पोलीस अधिकारी, आरटीओ, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.