

कल्याण : सतीश तांबे
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचने नंतर आता प्रभाग आरक्षण सोडतीचे वेध लागले असून येत्या आठवड्यातील मंगळवारी 11 नोव्हेंबरला पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्य मंदिरात प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठी च्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
आरक्षित प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे या प्रभाग आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने केडीएमसी आगामी पालिका निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्या नुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची आगामी पालिका निवडणुका प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे 122 सदस्य निवडीसाठी 122 प्रभाग तून चार सदस्यांचे 29 पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल अश्या 31 पॅनल ची निवडणूक घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रभाग रचना जाहिर करून तीला शासनाने अंतीम मंजुरी दिली आहे. त्या नंतर सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने त्या नुसार कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी 11 नोव्हेंबरला कल्याणातील आचार्य अत्रे नाट्य मंदिरात ही सोडत काढली जाणार असून, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
2011 च्या जनगणनेनुसार कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख लाख 18 हजार 762 आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 50 हजार 171 असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 आहे. या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारावरच प्रशासनाकडून प्रभागांचे आरक्षण ठरवण्यात आलं आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 सदस्य असे 13 प्रभाग आरक्षित असणार आहेत.
उर्वरित 109 प्रभागांची सोडत काढण्यात येणार असून सुप्रीम कोर्टाच्या 6 मे 2005 च्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) 27 टक्के जागा राखीव होणार आहेत. त्यामुळे ओबीसीसाठी 33 प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. असे एकूण 46 प्रभागाची सोडत काढण्यात येणार आहे. एस.सी,एसटी व ओबीसी प्रवर्गातील आरक्षित असणाऱ्या 46 प्रभागा तील 50 टक्के प्रभाग या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार आहेत. तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील 122 प्रभागांच्या सदस्य निवडीसाठी असलेल्या एकूण 122 प्रभागा पैकी 50 टक्के 61 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे.