

डोंबिवली : बजरंग वाळुंज
कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या वरप गावाजवळ एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बॅगमध्ये एका वयोवृध्दाचा मृतदेह आढळून आला होता. ऑगस्ट महिन्यात हा प्रकार उघडकीस आला होता. कल्याण तालुका पोलिसांसह ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते.
ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चार महिन्यानंतर मुकेश श्यामसुंदर कुमार मर्चंट नेव्ही अधिकारी यांच्या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. मुकेश श्यामसुंदर कुमार (62) असे हत्या झालेल्या सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचे नाव असून ते कल्याणमधील खडकपाडा परिसरात राहत होते.
विशेष म्हणजे हत्या झालेल्या मुकेश कुमार यांची हत्या त्यांच्या नातेवाईकानेच केल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघडकीस आले आहे. अजयकुमार रघुनंदन मिश्रा (52) आणि त्यांचा 17 वर्षाचा मुलगा या बाप-लेकाने मिळून मुकेश कुमार यांना संपविल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेने अजयकुमार याला अटक केली आहे. तर ताब्यात घेतलेल्या त्याच्या अल्पवयीन मुलाला भिवंडीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
वरप गावच्या हद्दीत एका कचऱ्याच्या ढिगात 15 ऑगस्ट रोजी एक नवीन कोरी बॅग (सुटकेस) आढळली होती. तेथे लघुशंकेसाठी गेलेल्या एका पादचाऱ्याला सदर बॅगचा संशय आला. त्याने ती बॅग उघडली असता त्यात मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी अर्थात बॅग पाहणाऱ्याने दिलेल्या जबानीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तालुका पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने या खुनाचे गूढ उकलण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कदम, आकाश साळुंखे, सुनील कदम, प्रकाश साहील, संतोष सुर्वे, सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते, स्वप्निल बोडके, रवी राय आणि दीपक गायकवाड या पथकाने कल्याण-मुरबाड-नगर महामार्गावरील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. याच दरम्यान हवालदार प्रकाश साहील यांना खासगी गुप्तहेरांकडून माहिती मिळताच त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे यांना दिल्यानंतर तपास चक्रांना चालना मिळाली.
बॅगेतील मृतदेह सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याचा असून ते कल्याणच्या खडकपाडा भागातील उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. त्यानुसार पथकाने मुकेश कुमार राहत असलेल्या सोसायटीत जाऊन चौकशी केली. मुकेश कुमार हे 11 ऑगस्टपासून घरातून बेपत्ता असल्याचे समजले. तर चुलत भाऊ अजयकुमार मिश्रा हा वरप गावात राहणारा असल्याने याच गावच्या हद्दीत मुकेश कुमार यांचा मृतदेह आढळून आल्याने संशयाची सुई त्याच्यावर स्थिरावली. पथकाने अजयकुमार मिश्रा याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली.
अजयकुमारच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे आली. 11 ऑगस्ट रोजी अजयकुमार याने त्याचा चुलत भाऊ मुकेश कुमार यांना बहाणा करून वरपच्या घरी बोलविले. तेथे विषप्रयोग करून त्यांची घरातच हत्या केली. त्यानंतर मृतदेह बॅगेत भरून तो वरप गावाजवळील कचऱ्याच्या ढीगाऱ्यात फेकून पळ काढला. सेवानिवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी मुकेश कुमार यांची मुले परदेशात असतात. त्यांच्या पित्याला संपाविल्यानंतर हाक-ना-बोंब होईल आणि मुकेश कुमार यांची संपत्ती हडपण्याचा मार्ग सुकर होईल असे अजयकुमार मिश्रा याला वाटले. मात्र या खुनाच्या प्रकरणात अजयकुमार याच्या 17 वर्षीय मुलानेही त्याला साथ दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेने त्यालाही ताब्यात घेतले. एकीकडे मुकेश कुमार यांचा खूनी अजयकुमार याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे त्याच्या अल्पवयीन भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहेत.