

Dombivli murder mystery solved
डोंबिवली : डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ एप्रिल रोजी एका इमारतीमधील घरात तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला होता. मंगळवारी मृत तरूणीच्या नातेवाईकांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मृत तरूणीचा प्रियकर सुभाष श्रीधर भोईर (४२, रा. सर्वोदय स्नेह बिल्डींग, ठाकुर्ली) असे अटक करण्यात आलेल्या खून्याचे नाव असून त्याला कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ असलेल्या पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.
अटक करण्यात आलेला सुभाष भोईर हा तरूणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून सुभाषने गळा आवळून तरूणीची हत्या केली आणि तेथून पळ काढला. अखेर मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने अवघ्या २० तासांत सुभाष भोईरला बेड्या ठोकल्या.
ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या सुभाष भोईर याचे या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले होते. २२ एप्रिल रोजी या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. संतापलेल्या सुभाष भोईर याने प्रेयसीचा गळा घोटून तिची हत्या केली. जमिनीवर पडलेल्या प्रेयसीची हालचाल बंद पडल्याचे पाहून सुभाष भोईर याने घरातून पळ काढला.
तरूणीचा घरात मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात पाठवून दिला. सुरूवातीला या प्रकरणी एडीआर अर्थात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र आठवडाभराने मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी या तरूणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळकनगर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
याच गुन्ह्याचा क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने समांतर तपास सुरू केला. मृत तरूणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर क्राईम ब्रँचच्या संशयाची सुई स्थिरावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवा. विलास कडू, सुधीर कदम, विजय जिरे, सचिन भालेराव, प्रविण किणरे, मिथून राठोड आणि विजेंद्र नवसारे या पथकाने तपास चक्रांना वेग दिला.
एकीकडे तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शोध सुरू होता. घटनास्थळावरून नाट्यमयरित्या पसार झालेल्या खुन्याच्या मागावर असतानाच हा खूनी कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे क्राईम ब्रँचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा लावून सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. खूनी सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच क्राईम ब्रँचने त्याच्या मुसक्या आवळल्या. खून केल्याची कबूली देणाऱ्या या आरोपीला पुढील चौकशीसाठी टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.
क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मोठ्या महत्प्रयासाने जेरबंद केलेला खूनी सुभाष भोईर हा शिवसेनेचा पदाधिकारी असून मृत तरूणी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी करत होती. कोरोना महामारीच्या काळात झालेल्या ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. ठाकुर्लीत हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. सुभाषच्या पत्नीचे निधन झाले होते. तर त्याची प्रेयसी देखिल पतीपासून विभक्त झाली होती. या दोघांनाही मुले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.