

ठाणे: शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबातील इतर अशा सात सदस्यांविरोधात त्यांची सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात राऊत पिता-पुत्रासह चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील आरोपी व भोंदूबाबा फिरोज शेख यास ठाणे पोलिसांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव येथून अटक केली आहे. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
राऊत नियमितपणे फिरोज बाबाच्या दर्ग्यावर
जादूटोणा प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्या फिरोज बाबाला सावंतवाडीच्या कोलगाव येथून अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
आपल्या दर्ग्यावर माजी खासदार राऊत आणि त्यांचा परिवार हे मुलाचे लग्न होण्यापूर्वीपासून येत आहेत. त्यांची श्रद्धा असल्याने ते नियमित दर्ग्यावर येतात अशी माहिती पोलीस तपासात फिरोज बाबाने दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फिरोज बाबाची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत असल्याने पोलीस त्यास मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.