

Harshvardhan Sapkal on Ladki Bahin CAG report
मुंबई: श्रीराम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पोट भरले नाही म्हणून त्यांनी आता‘लाडकी बहीण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे.
लाडकी बहीण योजनेवरील ३,५४१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे कोणतेही रेकॉर्ड किंवा हिशोब उपलब्ध नाही, असे ताशेरे कॅगने मारले आहेत. ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
भाजप महायुती सरकारने 'लाडकी बहीण योजने' अंतर्गत कोट्यवधी रुपयांची अनियमितता केली आहे. 'लाडकी बहीण योजने' च्या आर्थिक व्यवस्थापनात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
या योजनेसाठी २९,६९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तरीही सरकारने मंजूर बजेटपेक्षा ३,५४१ कोटी रुपये अधिक खर्च केले. या ३,५४१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे कोणतेही रेकॉर्ड नाही. हिशोब उपलब्ध नाही. शिवाय, या योजनेअंतर्गत निधीची प्रत्यक्षात काहीही गरज नसतानाही तो काढून घेण्यात आला.
महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी होणारा खर्च २६१ कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये ३३ हजार ५५४ कोटी रुपयांवर गेला. महिला योजनांवर खर्च वाढला असताना गृहनिर्माण विभागातील योजनांवरील खर्च तब्बल ५४ टक्क्यांनी कमी झाला असून पाणी पुरवठा व स्वच्छतेवरील खर्चात ३१ टक्क्यांची घट झालेली आहे. पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी करून लाडकी बहीण योजनेवर वाढलेल्या खर्चामुळे सेवा वितरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे ताशेरेही कॅगने ओढले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींसाठी असलेल्या लेक लाडकी योजनेतून ३४९० कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे. हा सर्व प्रकार आर्थिक बेशिस्तीचा आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सरकारने ९२ लाख लाडक्या बहिणींनाच केवायसीच्या नावाखाली योजनेतून वगळले, हा लाडक्या बहिणींचा विश्वासघात आहे.लाखो बहिणींना योजनेतून वगळल्याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला.