

Bhayandar fisherman Eel Bite
भाईंदर : उत्तन समुद्रकिनारी 42 वर्षीय भोईर नामक मच्छीमाराच्या डाव्या हाताला वाम (ईल) या माशाने चावा घेत त्यांच्या मनगटाला गंभीर दुखापत केल्याची घटना काही 6 ऑक्टोबरला घडल्याचे समोर आले आहे.
वामने घेतलेल्या चाव्यामुळे त्या मच्छीमारावर हात गमाविण्याची वेळ आली होती. मात्र त्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याचा हात वाचविण्यात डॉक्टरांना यश आले असले तरी त्याच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भोईर हे उत्तन समुद्रकिनारी खडकाळ जागेत 6 ऑक्टोबर रोजी मासेमारी करीत असताना त्यांनी पकडलेली वाम त्यांच्या हातातून निसटली. आणि तिने त्यांच्या डाव्या मनगटावर दोन वेळा चावा घेतला. यामुळे भोईर यांच्या मनगटावर गंभीर जखमा होऊन त्यातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते.
हि बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी भोईर यांच्या अपघातग्रस्त हाताला तात्काळ घट्ट पट्टी बांधून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या हातावर घरीच उपचार सुरु केला. मात्र भोईर यांच्या हाताला प्रचंड सूज येऊ लागल्याने त्यांना तब्बल 17 तासानंतर मीरारोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी भोईर यांचा हात व बाहू प्रचंड सुजलेले, फिके पडलेले आणि त्यातून पूर्णपणे रक्तप्रवाह होऊन ते संवेदनाहीन झाले होते. यामुळे त्यांना त्या हाताची बोटे हलविणे देखील अशक्य ठरू लागले.
किंचित हालचाल केली तरी त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांच्या हाताची सखोल वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या हाताला ॲक्युट कम्पार्टमेंट सिंड्रोम झाल्याचे निदान तेथील डॉक्टरांकडून करण्यात आले. यामुळे त्यांच्यावर हात गमाविण्याची वेळ आली असतानाच डॉक्टरांनी त्यांच्या हातावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यात डॉक्टरांना यश आले असले तरी त्यांच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार असून ते अद्यापही रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.
हातातील रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला
त्यांच्यावर उपचार करणारे प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव मायक्रोसर्जन डॉ. सुषिल नेहेते यांनी सांगितले कि, भोईर यांना जेव्हा रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांच्या हातातील रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला होता. यामुळे त्यांच्यावर हात गमाविण्याची वेळ आली होती. मात्र त्यांच्यावर तातडीने फॅसिओटोमी शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या हातातील रक्तप्रवाह पुनर्स्थापित करण्यात यश आले. यामुळे भोईर यांच्या हाताला संवेदना होऊन हालचाल करणे शक्य होऊ लागले. सध्या ते फिजिओथेरपीचा उपचार घेत असून लवकरच त्यांच्या हातावर त्वचा प्रत्यारोपण (स्किन ग्राफ्टिंग) करण्यात येणार आहे.