

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकहाती लढण्यासाठी भाजपाने चाचपणी सुरु केली आहे. कल्याण ग्रामीणचे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी एकाच महिन्यात तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मतदारसंघातील विविध समस्यांची कारण भेटीदरम्यान समोर येत असली तरी भोईर यांच्या भाजपात घर वापसीची चर्चा सुरु झाली आहे. भोईर यांचे ठाणे, कल्याण -डोंबिवलीसह 14 गावांमध्ये चांगले प्राबल्य असल्याने भाजपाला बळ मिळू शकते, अशी गणित भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून मांडण्यात आल्याचे बोलले जाते.
शिवसेनेतील फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांची साथ देणारे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लागोपाठ तीन भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे जिल्हा परिषदेसह ठाणे मनपा, कल्याण डोंबिवली आणि नवी महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामुळे भोईर - फडणवीस यांची भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून भोईर ओळखले जात असून त्यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि भाजपच्या नेत्यांशी भोईर यांनी जुळवून घेतल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर सुभाष भोईर पहिल्यांदा भाजपाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक, सिडको सदस्यपद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार पद भूषविले. कल्याण ग्रामीण विधानसभेचे शिवसेना आमदार म्हणून निवडून आलेले भोईर हे मागील निवडणुकीत पराभूत झाले. आगरी समाजाच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग आहे.