उनकदेवचा उनकेश्वर

Unkadeo Unkeshwar Temple
उनकदेवचा उनकेश्वरpudhari photo
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

मराठवाडा नेहमीच मंदिर स्थापत्यात महाराष्ट्रात अग्रेसर राहिला आहे. अनेक उत्तमोत्तम मंदिरं या प्रभागात आपल्याला दिसतात. नांदेड जिल्हाही अशा अनेक मंदिरांना बाळगून आहे. त्यातल्या किनवट तालुक्यात किनवट जंगलाला ईशान्य दिशेला 40 किलोमीटरवर उनकदेव नावाचं एक गाव आहे.

गावाच्या तिन्ही बाजूंनी किनवटच्या जंगल विभागाचं साम्राज्य आहे. उनकदेव गावाच्या पश्चिमेला रेणुका मातेच्या शक्तिपीठासाठी प्रसिद्ध असलेला माहूरगड फक्त 40 किमी वर आहे आणि तेलंगणा राज्याची सीमा केवळ 14 किमीवर आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या संस्कृतींचा मिलाप या ठिकाणी आढळून येतो.

प्रत्येक गावाचं काही वैशिष्ट्य असतं. काही आख्यायिका गावाशी निगडित असतात. तशी एक आख्ययिका इथेही रूढ आहे. शरभंग ऋषींनी घोर तपश्चर्या केली आणि श्री राम त्यांना प्रसन्न झाले. श्रीरामाने बाण मारून उष्ण पाण्याचा झरा निर्माण केला ज्यात स्नान करून शरभंग ऋषी रोगमुक्त झाले ते हे उनकदेव स्थान.

Unkadeo Unkeshwar Temple
TMC Politics : विरोधी पक्षनेते पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस

गावात या आख्यायिकेला अनुसरून श्रीरामाचं मंदिर आहे. भाता आणि शिवधनुष्य धारण केलेली रामाची मूर्ती गाभाऱ्यात असून बाहेर डाव्या बाजूला शरभंग ऋषींची समाधी पादुकांच्या रूपात आपल्याला दिसते. त्या आख्यायिकेचा पुरावा म्हणून इथे मंदिराबाहेर गरम पाण्याचे कुंडदेखील आहे. शेजारीच गार पाण्याचेसुद्धा कुंड आहे. शेजारी उनकेश्वराचं यादवकालीन शिवमंदिर आहे. याचा पुरावा म्हणून या शिवालयाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस व डाव्या भिंतीवर असे दोन शिलालेख त्याच्या प्राचीनतेची साक्ष देत आहेत.

मंदिर 13व्या शतकात बांधलेलं असून या शिलालेखांमधला एक लेख इ.स. 1279 मधला असून त्यात मातापूरच्या शरणूनायकाचा पुत्र मेघदेव याने उनकदेव मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. हा देवगिरीच्या रामदेवरायाचा मांडलिक होता. या शिलालेखांमध्ये महत्त्वाची माहिती मिळते. डॉ. मंजिरी भालेराव व कल्पना रायरीकर यांच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे प्राचीन काळात प्रधानांच्या हाताखाली अधिकारी नेमले जात. त्यांना सर्वाधिकारी किंवा कधी कधी निरोपित संबोधलं जाई.

या शिलालेखात कस्तु सोम पंडित हा हेमाडी पंडित या प्रधानाच्या निरोपित आहे, असे नमूद केलेले आढळते. इथे प्रधान या पदाचाही स्पष्ट उल्लेख सापडतो. तसेच साहणी म्हणजे सल्लागार असा अर्थ आहे. मंत्रिमंडळाखेरीज विशेष सल्लागार नेमले जात, ते म्हणजे साहणी. या शिलालेखात भावकदेव हा हाथीसाहणी आहे असे लिहिलेले आढळते.

उनकेश्वर मंदिर साध्या बांधणीचे असून त्यात फारशी कलाकुसर आढळत नाही. मंदिर प्रवेशद्वार बुटके असून आत मंडप मोठा आहे व त्यावर सोळाकोनी छत आहे. छत आतून घुमटाकृती आहे. नंदी मंडपातच आहे. पूर्वी कदाचित नंदीमंडप असावा, नंतर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे नंदी गाभाऱ्यात आणून ठेवला असावा. अंतराळ लहानसे असून त्यात दोन बाजूंना रिकामी देवकोष्ठे आहेत. गाभाऱ्याच्या ललाटपट्टीवर गणेश प्रतिमा असून आत शिवपिंड आहे.

उनकदेव गाव अडाण नदीच्या काठी वसले असून शेजारच्या दारसांगवी गावात या नदीवर मोठं धरण बांधलं आहे. उनकदेव गावाच्या आजूबाजूचा परिसरही प्राचीन आणि ऐतिहासिक संदर्भांनी संपन्न आहे. गावाच्या उत्तरेस वाघरटाकळी नावाचं गाव असून त्यात चालुक्य काळातलं शिव मंदिर आहे. मंदिर एका लहानशा टेकडीवर बांधलेलं असून त्याची मंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी रचना आहे. पण आता मंडप खुला असून त्यातच नंदी आहे. सभांडपात जाताना दोन्ही बाजूंना अर्धभिंती बांधल्या आहेत. सभामंडपातच शिवपिंड आणि काही भग्न मूर्ती बांधून ठेवल्या आहेत. वाघरटाकळी गावाच्या पूर्वेला टिपेश्वर अभयारण्य आहे.

Unkadeo Unkeshwar Temple
Air Pollution Crisis : स्वच्छ आणि शुद्ध हवा !

नदीचा प्रवाह धरून पश्चिमेकडे गेलं की 25 किलोमीटर वर कापेश्वर गाव आहे. या गावातही उनकेश्वरप्रमाणे कपिलेश्वर नावाचं शिवालय आहे. पण या मंदिरावर बाह्यभिंतींवर काही शिल्पपट कोरलेले आहेत ते लक्ष वेधून घेतात. हे मंदिर जीर्णोद्धारीत असून त्याची रचना गाभारा, अंतराळ, मंडप अशी आहे. मंडप नवा बांधलेला असून फक्त गाभारा प्राचीन आहे. त्यात शिवपिंड असून मागे देवकोष्ठात अन्नपूर्णेचा तांदळा आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींच्या वरच्या बाजूस चार दिशांना सिंहांची आक्रमक शिल्पं साम्राज्याचा वचक प्रदर्शित करतात. एका देवकोष्ठात हनुमानाची हातात द्रोणागिरी पर्वत उचललेली मूर्ती आहे.

उनकदेवच्या उत्तरेला रत्नापूरचं कपिलेश्वर मंदिरही पाहण्यासारखं आहे. रत्नापूर हे अरुणावती व अडाण नद्यांच्या संगमाचं गाव त्यामुळे त्याला तीर्थक्षेत्राचं महत्त्व लाभलं आहे. या शिवमंदिरात गणेश, शिवपार्वती, नरसिंह, विष्णू अशा विविध मूर्ती देवकोष्ठांत दिसतात. या मंदिराची स्थिती मात्र तितकी चांगली नाही.

मंदिरात पाताळ लिंग आहे त्यामुळे गाभाऱ्यात उतरून जायला पायऱ्या केलेल्या आहेत. गावकऱ्यांनी तात्पुरतं छप्पर घालून मंडप धार्मिक कार्यांसाठी वापरता ठेवला आहे. मंदिराचे खांब व सुटे अवशेष परिसरात बघायला मिळतात. पण कोणीही त्यांची दखल घेतलेली दिसत नाही. यादव काळात हा परिसर इतकी मंदिरं आहेत म्हणजे समृद्ध असणार हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news