

नूतन बांदेकर
आज मला एकच प्रश्न पडतो आहे, तो म्हणजे दिल्लीतील हवेच्या प्रदूषणातून आपण काय शिकलो? आपण या पृथ्वीवरचे एक सामान्य प्राणी आहोत, निसर्ग साखळीतील एक भाग आहोत. मग आपल्याला ती साखळी बिघडविण्याचा काही अधिकार आहे का? एवढी साधी सरळ गोष्ट आपल्याला निश्चितपणे समजते; परंतु उमजत नक्कीच नाही. आपण स्वमग्न आहोत. त्यापलीकडे जाऊन विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. पण हे दुर्लक्ष आपल्याला नजीकच्या भविष्यात किती महाग पडेल?
काही दिवसांपूर्वी हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दिल्लीतील शाळांना सुट्टी जाहीर झाल्याची बातमी मीडियाने दिली. शासनाने हा निर्णय घेऊन तत्काळ अंमलात आणला. बातम्या वाचून, ऐकून आणि पाहून आम्ही अस्वस्थ झालो. त्याचं कारणही तसंच होतं. मुंबईची दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही हे आपण जाणतो. दिल्ली शहरातील हवेची गुणवत्ता एवढी खालावली होती की त्यामुळे दैनंदिन वाहतूक देखील नामंजूर झाली.
अर्थात दिल्ली हे भारतातलं पहिलं शहर हवेच्या प्रदूषणामुळे थांबलं होतं. शाळा बंद ठेवणे हा उपाय नव्हता, तर नाईलाज म्हणून घेण्यात आलेला निर्णय होता. श्वसनासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी असण्याबरोबरच कार्बन मोनॉक्साईडसारखे इतर घातक वायूंचे वाढलेले प्रमाण ही खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. अर्थात आज प्रगतीच्या हव्यासापोटी प्रत्येक शहराने स्वतःची हीच अवस्था कळत-नकळत करून घेतली आहे. त्याला जबाबदार दुसरे तिसरे कुणी नसून आपणच आहोत असंच नाईलाजाने म्हणावे लागते.
माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत, असे जरी म्हटले जात असले तरी त्याहीपेक्षा माणसाला जिवंत राहण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत, हे सर्वज्ञात आहे. किंबहुना सगळ्याच सजीवांना प्राणवायू, पाणी आणि अन्न या तीन गोष्टी शिवाय जगणं अशक्य आहे.
सृष्टीच्या नियमानुसार माणसाचा श्वास म्हणजे ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे सुरू असणं हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. अन्यथा कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन माणसाचे मरण काही काळासाठी पुढे ढकलले जाऊ शकते. अशा घडीला अद्ययावत आरोग्यव्यवस्था आणि डॉक्टर्स देखील हतबल होतात आणि मग परमेश्वराचा धावा केला जातो. या सगळ्याचा विचार जर आपण करत असू तर आपल्या लक्षात येते की, आपले अस्तित्व, आपले आरोग्य, आपले जगणे या कशावरही आपले एकट्याचे नियंत्रण नाही. आपण निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा केवळ एक घटक आहोत. या नैसर्गिक घडामोडींशी आपलं जीवन निगडित आहे. म्हणूनच निसर्गनिर्मित गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय.
आपल्या जीवनासाठी सगळ्यात पहिला आणि अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे हवा! त्यातील ऑक्सिजन, जो आपल्याला एकही रुपया खर्च न करता अविरतपणे निसर्गाकडून मिळतो. त्यासाठी आपण निसर्गाचे आभार मानतो का? केवळ एक दिवस नव्हे काही क्षण सगळ्या वृक्षवेलींनी ऑक्सिजन बाहेर सोडणं बंद केलं तर काय होईल? पण ते माणसासारखे स्वतःचा विचार करणारे बुद्धिवंत नाहीत आणि
स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाच्या चक्रामध्ये बदल करून इतरांना त्रास देत नाहीत. त्यामुळे त्यांचं निसर्गनिर्मित चक्र अविरतपणे सुरू असते. खरं तर हवेचे प्रदूषण ही गोष्ट इतकी किरकोळ नक्कीच नाही, की आपण त्याकडे डोळेझाक करून पुढे जावं. प्रत्येक सुजाण व्यक्तीला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचे महत्त्व निश्चितच माहीत असते.
कोरोनाच्या महामारी दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, हे विसरून कसे चालेल? त्यावर उपाय म्हणून घरोघरी ऑक्सिजनचे सिलिंडर नव्या रूपात दाखल झाले होते. कोरोनामधील ऑक्सिजनचा तुटवडा ही एक झलक होती. परंतु दिल्लीचे हवामान बदलणे (बिघडणे) ही खऱ्या संकटाची चाहूल तर नसेल? म्हणूनच धोक्याची घंटा आपल्या डोक्यातसुद्धा वाजली आणि आपण अस्वस्थ झालो. मात्र काही दिवस गेले आणि पूर्वस्थितीत आलो, हे खरं दुर्दैव!
चौकाचौकात जाहीर होत असलेल्या हवेच्या गुणवत्तेची (शुद्धतेची) आकडेवारी सहज नजरेपुढून पुढे सरकते, आम्ही आणखी वेगाने वाहने हाकत पुढे निघून जातोय. ते आकडे आपल्या शहराच्या हवेची शुद्धता, स्वच्छता, योग्यता आणि एकंदरीत गुणवत्ता सांगत असतात. तरीही आपण अनभिज्ञ असतो आपल्या आजूबाजूच्या हवामानात होणाऱ्या बदलाबाबत! काय म्हणावे याला!
आज मला एकच प्रश्न पडतो आहे, तो म्हणजे दिल्लीतील हवेच्या प्रदूषणातून आपण काय शिकलो? आपण या पृथ्वीवरचे एक सामान्य प्राणी आहोत, निसर्ग साखळीतील एक भाग आहोत. मग आपल्याला ती साखळी बिघडविण्याचा काही अधिकार आहे का? एवढी साधी सरळ गोष्ट आपल्याला निश्चितपणे समजते; परंतु उमजत नक्कीच नाही. आपण स्वमग्न आहोत. त्यापलीकडे जाऊन विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. पण हे दुर्लक्ष आपल्याला नजीकच्या भविष्यात किती महाग पडेल?
कदाचित निसर्ग आपल्याला वेळही देऊ शकणार नाही, कारण वेळ आताच निघून जातेय, अगदी झपाट्याने! मंडळी, आता तरी गांभीर्याने विचार करायलाच हवा. प्रदूषणाच्या राक्षसाचा विळखा पडतोय. सावध व्हायलाच हवं. या राक्षसाला जन्माला घालणाऱ्या, त्याला खतपाणी घालणाऱ्या सगळ्याच गोष्टी रोखणे किंवा नष्ट करणे सहजसाध्य होणार नाही, हे निश्चित. परंतु ज्या पर्यावरण विरोधी गोष्टी आपल्याकडून अनवधानाने होतात, त्या टाळणे सहजशक्य होईल. तर आजपासून विचार करायला सुरू करूया. शुभस्य शीघ्रम! हवेची गुणवत्ता राखूया, भविष्य सुरक्षित करूया!