

डोंबिवली : डोंबिवलीत अडीच लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती सध्या लक्षवेधक ठरत आहे. रंगीत पणत्यांच्या माध्यमातून आकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर... एक सांस्कृतिक परिवारने ही अभिनव कलाकृती तयार केली आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारी ही कलाकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक डोंबिवली जिमखाना मैदानावर गर्दी करत आहेत.
साहित्य, संस्कृती आणि कलेचे माहेरघर असलेल्या सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीचे रविंद्र चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत. डोंबिवलीकर...एक सांस्कृतिक परिवारचे संपादक असलेले आमदार चव्हाण यांनी या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, भारतमातेच्या पूजनाचे संस्कार बालपणातून झालेले असल्याने आणि त्या भारतमातेचे गुणगान गाणारे व वंदन करणारे राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम् असल्याने अशा श्रद्धा व आस्थेच्या वंदे मातरम् गीताला यंदा 150 वर्षे पूर्ण झाले आहेत.
त्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्याचा डोंबिवलीकर...एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला. चेतन राऊत, तसेच प्रभू कापसे व वैभव कापसे या पिता-पुत्रांच्या जोडीने आणि अन्य कलाकार-साथीने मिळून सतत नऊ दिवस काम केले. पणत्या रंगवून कलात्मकतेचा अविष्कार सादर केल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी काढले. ते पुढे म्हणाले, भारतमाता आपल्यासाठी देवीचे स्वरूप आहे, म्हणून तिचे सनातन संस्कृतीत आपण पूजन करतो.
आपण सर्वजण त्याच धरतीची लेकरे आहोत. या मातीतूनच तयार केलेल्या पणत्यांनी मोझॅक साकारण्याची कल्पना सुचली आणि भारतमातेला, वंदे मातरम् गीताला अनोखी मानवंदना देण्याचे ठरले. 95 फूट उंची आणि 75 फूट रूंदीची अशी सुमारे अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा (दिव्यांचा) वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझॅक कलाकृती निर्माण करण्यात आली आहे.
अवघ्या नऊ दिवसांत साकारली कलाकृती
या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झाला आहे. ही कलाकृती कलाकार चेतन राऊत, वैभव कापसे तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीमने अवघ्या नऊ दिवसांत साकारली. डोंबिवली जिमखानातर्फे सुरू असलेल्या उत्सवात ही कलाकृती 28 डिसेंबरपर्यंत खुली ठेवण्यात आली आहे. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.