

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीतील युतीच्या अभूतपूर्व यशानंतर महानगरपालिकांना सामोरे जाण्यासाठी एकदिलाने काम करू. नागरिकांना महाराष्ट्र बदलतो आहे, प्रगतिपथावर आहे याची हमी देण्यासाठी जागावाटप चर्चा फार न लांबवता, त्याला फाटे न फोडता एकीचे वातावरण जनतेपर्यंत पोहोचवावे असा निर्णय आज भाजप बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषदा निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे कोणावरही टीका न करता समन्वयाचे धोरण स्वीकारले होते त्याचप्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुकीतही ते सामोपचाराची भूमिका घेणार आहेत. मात्र ही भूमिका घेताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, जिंकू शकणाऱ्या जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला मिळतील याची खातरजमा करण्याचेही त्यांचे धोरण असल्याचे समजते.
शिवसेना शिंदे गटाशी चर्चा करण्यापूर्वी सोमवारी भारतीय जनता पक्षाने उच्चस्तरीय बैठक घेत पक्षाच्या ताकदीचा आढावा घेतला. नगरपरिषदांमध्ये काही ठिकाणी सहकारी पक्ष पुढे गेल्याने तेथील वातावरणाचा अंदाज घेत काय चुका झाल्या हे आजच्या बैठकीत लक्षात घेण्यात आले तसेच आता कुठे किती जागा द्यायला हव्यात याचाही अंदाज घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. दुसरीकडे त्याच वेळी शिवसेना शिंदे गटातही या संदर्भातील चर्चा सुरू झाल्या. त्यातच एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विश्वासू सहकारी उदय सामंत यांना जागावाटप चर्चेसाठी मुंबईत बोलावून घेण्यात आले. ते गोवा मार्गे रात्री उशिरा मुंबईत पोचल्यानंतर चर्चा सुरु होईल.
शिवसेना शिंदे गटाला योग्य त्या जागा देण्याची भाजपची तयारी आहे, मात्र मुंबईमध्ये 125 जागा देण्याएवढी त्यांची ताकद नाही. अशा चर्चेतून कोणताही मार्ग निघणार नाही, उलट कटुता वाढेल असेही सांगण्यात आले आहे.
ठाणे तसेच मुंबई या एमएमआर परिसरातील महानगरपालिकेत युती होणार हे निश्चित झालेले आहे. जागा कोणत्या कोणी लढायच्या याचा नर्णय येत्या एका दिवसात जाहीर केला जाईल. ठाकरे बंधूंचे जागावाटप लक्षात आल्यानंतर युतीची आकडेवारी महायुती अंतिम करणार आहे.