

Ulhasnagar Municipal Corporation
उल्हासनगर : मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर या उपक्रमाचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्या कामगिरीतून 100 पैकी 86.29 टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले आहे.
देंवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयीन मूल्यांकन 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम राबविण्यात आली. सर्व कार्यालये पारदर्शक, ऑनलाईन, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा या मोहिमेत समावेश होता. या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. 100 दिवसांच्या मुल्यमापनानंतर अखेर गुरूवारी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निकालाची घोषणा केली. यात उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त या श्रेणीत 86.29 टक्के गुण मिळवले आहेत.
महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यालयीन मूल्यांकन 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम राबविण्यात आली. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सर्वोच्च कामगिरी बजावलेल्या शासकीय कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या क्रमवारीत ठाण्याने 92 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महापालिका क्रमवारीत उल्हासनगर महानगरपालिकेने 86.29 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे सर्वोत्तम विभागीय आयुक्त या क्रमवारी कोकण विभागीय कार्यालयाने 75.43 टक्के गुण घेत पहिला क्रमांक पटकावला आहे.
पहिला क्रमांक पटकावलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांचा सत्कार पालिका प्रशासनामार्फत करण्यात आला. या यशाचे मानकरी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सांगितले. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उल्हासनगर महापालिकेचा कारभार जलद होण्यासाठी इऑफिस प्रणाली कार्यान्वित केली. तसेच शहरांमध्ये पार्क पल कंपनीबरोबर इ पार्किंग सुविधा, चौक आणि रस्त्यांचे सौंदर्यीकरण, सहज वापरता येण्यासाठी महापालिकेची नवीन वेबसाईट, घरबसल्या सुविधा मिळाव्यात सुविधांचे ऑनलाईन डिजिटालायझेशन, कोंदडलेल्या अस्वच्छ कार्यालयांचे सुसज्ज कार्यालयात रूपांतर अशा विविध उपक्रमांचा या पुरस्कार प्राप्ती फायदा झाल्याचे आव्हाळे यांनी सांगितले.
क्रमांक जाहीर झाल्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, सहायक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे, लेखा अधिकारी किरण भिलारे, लेखापरीक्षक शरद देशमुख, उपायुक्त विजय खेडकर, दिपाली चौगुले, विशाखा मोडघरे, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे आदींनी मनीषा आव्हाळे यांचा सत्कार केला.