

Maharashtra District Council Performance
ठाणे : मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर या उपक्रमाचे मुल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये घुगे यांनी आपल्या कामगिरीतून १०० पैकी ९२ टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले आहे.
देंवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. सर्व कार्यालये पारदर्शक, ऑनलाईन, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा या मोहिमेत समावेश होता. या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. १०० दिवसांच्या मुल्यमापनानंतर अखेर गुरूवार १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या निकालाची घोषणा केली.
यात राज्यातील ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलिस अधीक्षक, ५ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ महापालिका आयुक्त, ३ पोलिस आयुक्त, २ विभागीय आयुक्त यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ९२ टक्के गुण मिळवत ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अग्रस्थान पटकावले आहे.